कर्जाच्या जाचातून विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; चिखली येथील धक्कादायक घटन.AIMA NEWS BULDHANA ASIF SHAIKH
चिखली (बुलढाणा): मध्यस्थी म्हणून राहिलेल्या पैशांच्या वसुलीसाठी मिळणाऱ्या सततच्या धमक्या आणि मानसिक त्रासाला कंटाळून, एका ३३ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. रुबीना बी अकील शाह (रा. चिखली) असे मृत महिलेचे नाव असून, याप्रकरणी चिखली पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, रुबीना बी यांची शेजारी राहणारी सुलताना बी सलीम शेख हिने दोन वर्षांपूर्वी एका त्रयस्थ व्यक्तीला (शमशुना फकीरा शेख) ३०,००० रुपये दिले होते. या व्यवहारात रुबीना बी यांनी मध्यस्थी केली होती. मात्र, मूळ कर्जदाराने पैसे परत न केल्यामुळे सुलताना बी ही रुबीना यांच्याकडे पैशांचा तगादा लावत होती.
"तू मध्यस्थी आहेस, तूच माझे पैसे दे, नाहीतर तुला घरातून बाहेर काढून जीवे मारीन," अशा धमक्या सुलताना बी सातत्याने देत असल्याचा आरोप मृत महिलेच्या वडिलांनी, मुक्तार शाह अकबर शाह (रा. मेरा खुर्द), यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
धमकीनंतर उचलले टोकाचे पाऊल
दिनांक ६ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सुलताना बी हिने रुबीना यांच्या घरी जाऊन पैशांवरून मोठा वाद घातला. "सकाळपर्यंत पैसे दिले नाही तर तुला मुलांसह घराबाहेर काढून तुझी बेइज्जती करीन," अशी धमकी दिल्याने रुबीना अत्यंत अस्वस्थ होत्या. याच मानसिक त्रासातून त्यांनी रात्री दीपक खरात यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
पोलीस कारवाई
दुसऱ्या दिवशी सकाळी ९:३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. वडिलांच्या तक्रारीवरून आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीवरून, चिखली पोलिसांनी आरोपी मुनव्वर सुलताना सलीम खान हिच्याविरुद्ध BNS (भारतीय न्याय संहिता) २०२३ च्या कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.