logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

कृर्षी ऊत्पन्न बाजार समिती, नांदुरा चे संचालक बलदेवराव चोपडे अपात्र !मुलाच्या नियुक्तीमुळे हितसंबंध सिद्ध !! अमरावती विभागीय सहनिबंधकांनी दिला निर्णय.

कृर्षी ऊत्पन्न बाजार समिती, नांदुरा चे संचालक बलदेवराव चोपडे अपात्र !
मुलाच्या नियुक्तीमुळे हितसंबंध सिद्ध !! अमरावती विभागीय सहनिबंधकांनी दिला निर्णय.....

नांदुरा :

कृषी उत्पन्न बाजार समिती, नांदुरा येथील संचालक तथा माजी सभापती बलदेवराव नामदेवराव चोपडे यांना अखेर संचालक पदावरून अपात्र ठरविण्यात आले आहे. मा. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती गौतम वर्धन यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयात महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम, २०१७ मधील नियम १०(१)(ह) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणात शिवसेना नेते ( ऊबाठा ) वसंतराव रामभाऊ भोजने, ( संचालक कृबास ) रा. जिगाव, ता. नांदुरा यांनी अपील क्रमांक ८/२०२५ दाखल करून बलदेवराव चोपडे यांच्या मुलगा अमोल बलदेवराव चोपडे यांना नांदुरा कृबास समितीत केलेली नियुक्ती हितसंबंध निर्माण करणारी असल्याचा आक्षेप घेतला होता.

बलदेवराव चोपडे हे बाजार समितीचे सदस्य व सभापती असतांनाच त्यांची सहायक सचिव पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे अपिलार्थीने नमूद केले होते.

अपिलार्थीच्या म्हणण्यानुसार, ही नियुक्ती केवळ नातेसंबंधातून झालेली नसून त्यातून बाजार समितीच्या रोजगारात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष हितसंबंध निर्माण झाला. याच मुद्द्यावरून त्यांनी जिल्हा उपनिबंधक, बुलढाणा यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र दि. २८ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा उपनिबंधकांनी ती फेटाळून लावली होती.

या आदेशाविरोधात दाखल अपीलावर सुनावणी करताना विभागीय सहनिबंधकांनी बुलढाणा जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशातील त्रुटींवर स्पष्ट बोट ठेवले. नियुक्ती प्रक्रियेत उत्तरवादींचा सहभाग होता किंवा नाही, हितसंबंध निर्माण झाला का, तसेच बाजार समितीकडून अग्रीम रक्कमेची ऊचल करून वापरल्याचे आरोपांची सखोल चौकशीच करण्यात आली नसल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले.

सुनावणीदरम्यान उत्तरवादी बलदेवराव चोपडे यांनी भरती प्रक्रिया नियमानुसार व गुणवत्तेच्या आधारे झाल्याचा दावा केला. त्यांच्या मुलाची निवड पात्रतेनुसार झाली असून कोणताही गैरवापर करण्यात आलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र विभागीय सहनिबंधकांनी समिती सदस्य असताना मुलाची बाजार समितीत नियुक्ती ही बाब स्वतःमध्ये गंभीर असल्याचे मान्य केले.

दरम्यान नियम १०(१)(ह) नुसार बाजार समितीच्या संविदा, रोजगार किंवा कामकाजात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष हितसंबंध असलेली व्यक्ती समिती सदस्य राहण्यास अपात्र ठरते. या तरतुदीचा आधार घेत विभागीय सहनिबंधकांनी बुलढाणा जिल्हा उपनिबंधकांचा आदेश रद्द करून बलदेवराव चोपडे यांना अपात्र घोषित केले आहे.
परिणामी त्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती, नांदुरा येथील संचालक पदावरून कमी करण्यात आले आहे.

दि. ६ मे २०२६ रोजी पारित झालेल्या या निर्णयामुळे बाजार समित्यांमधील नातेसंबंधातून होणाऱ्या नियुक्त्या, हितसंबंध आणि पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

8
272 views

Comment