logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाचीच अल्पवयीन मुलाकडून हत्या: रेल्वे रुळावर घडले हत्याकांड

शहापूर/ साजिद शेख
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
ठाणे रेल्वे स्थानकातील रेल्वे रुळांवर मित्रावर होत असलेले वार पाहून त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर या घटनेत त्याचा मित्र जखमी झाला आहे. हल्ला झाल्यानंतर तो पळून गेल्याने त्याचा जीव वाचला. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

विशाल पटेकर (२०) असे मृत मुलाचे नाव असून त्याचा १६ वर्षीय मित्र जखमी झाला आहे. तर आरोपी हा देखील साडे सतरा वर्षांचा असून त्याला ताब्यात घेतल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिली. असे असले तरी अल्पवयीन मुलांकडून होत असलेल्या गुन्हेगारीचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.

विशाल याचा एक मित्र त्याच्या गावी जाणार होता. त्यामुळे विशाल आणि त्याचे तीन मित्र ठाणे रेल्वे स्थानकात ५ मे या दिवशी रात्री ८.३० वाजता आले होते. गावी जाणाऱ्या मित्राला त्यांनी रेल्वे स्थानकातील पादचारी पूलावर सोडल्यानंतर त्यांना राजेश (नाव बदलले) हा भेटला. त्यानंतर चौघेही फलाट क्रमांक दोनवर आले. तेथून त्यांनी चणे विकत घेतले. चणे खात ते रेल्वे रुळांवरून चालत कल्याणच्या दिशेने जात होते. ठाणे रेल्वे स्थानकाजवळील खाडी पूलावर पोहचल्यानंतर त्यांनी धुम्रपान केले. त्यानंतर त्यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला.दरम्यान, विशाल याच्या १६ वर्षीय मित्राने त्याच्या एका मित्राला संपर्क साधून वाहन घेऊन येण्यास सांगितले. त्याचवेळी राजेश याने पूर्व वैमन्यस्यातून त्याच्यावर हातातील धारदार शस्त्राने हल्ला करण्यास सुरुवात केली. यामुळे त्याने तेथून पळ काढण्यास सुरुवात केली. विशाल हा त्याला वाचविण्यासाठी गेला असता, राजेश याने त्याचावरही वार केले.१६ वर्षीय मुलगा जखमी अवस्थेत रेल्वे स्थानक परिसरात आला. त्याला नागरिकांनी उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर तो पुढील उपचारासाठी स्वत: कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. तर राजेश याच्या हल्ल्यात विशाल हा गंभीर जखमी झाला होता. तो धावत स्थानकाजवळील एका कट्ट्यापर्यंत पोहचला. त्याच्या तिसऱ्या मित्राने त्याला प्रवाशांच्या मदतीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान हल्ला केल्यानंतर राजेश घटनास्थळावरून पळून गेला होता. या घटनेनंतर १६ वर्षीय मुलाचा जबाब पोलिसांनी घेतला असून त्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी हल्लेखोराला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

25
842 views

Comment