आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा; आरोपींना अटक नसल्याने पीडित कुटुंब आक्रमक
लातूर / जळकोट : जळकोट पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यात अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याने पीडित कुटुंबाने संताप व्यक्त केला आहे. आरोपींमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचा आरोप करत, संबंधितांना तात्काळ अटक न झाल्यास टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा कुटुंबीयांनी दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ००८५/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०८, ३५१(२) व ३(५) अन्वये ७ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८.४१ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ६ एप्रिल २०२६ रोजी घडल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादी शोभा दत्तात्रय जायभाये यांनी लातूर पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या निवेदनात सहा जणांविरोधात गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नावेही नमूद करण्यात आली असून, आरोपींना वाचवण्यासाठी तपासात जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, आरोपींमध्ये शिवाजी रामदास केंद्रे (वाढवणा पोलीस) आणि माणिक संतराम कसबे (जळकोट पोलीस ठाणे) यांचा समावेश आहे. गुन्हा दाखल होऊन एक महिना उलटूनही कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याने पीडित कुटुंबाने पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आरोपी खुलेआम फिरत असून आम्हाला सतत धमक्या दिल्या जात आहेत. आमचे संपूर्ण कुटुंब भीतीच्या छायेखाली आहे, अशी व्यथा फिर्यादीने आपल्या निवेदनात मांडली आहे. आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही अनुचित घटनेस पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, आता लातूर जिल्हा पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.