अहिल्यानगर जिल्हा बँकेवर तातडीने प्रशासक नियुक्त ! घुलेंना धक्का, राजकारणात ट्विस्ट
अहिल्यानगर:
राज्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (ADCC Bank) राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. बँकेचे विद्यमान अध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून, बँकेवर अखेर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सहकार विभागाने मंगळवारी सायंकाळी उशिरा याबाबतचे आदेश काढले असून, जिल्हा विशेष लेखापरीक्षक गौतम निकाळजे यांनी बँकेचा पदभार स्वीकारला आहे. जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत २० फेब्रुवारी २०२६ रोजीच संपली होती. मात्र, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार विभागाने जिल्ह्यातील सहकार संस्थांच्या निवडणुकांना ३१ मे पर्यंत स्थगिती दिली होती. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, एप्रिल महिन्यात सहकार कायद्यात झालेल्या बदलांमुळे मुदत संपलेल्या संस्थांवर प्रशासक नेमणे बंधनकारक झाले आणि परिणामी घुले पाटील यांच्या नेतृत्वाखालील मंडळाचे अधिकार संपुष्टात आले.गेल्या काही महिन्यांपासून चंद्रशेखर घुले पाटील (अजित पवार गट) हे विखे आणि थोरात या दोन्ही गटांच्या समन्वयाने बँकेचा गाडा हाकत होते. प्रशासक नियुक्तीमुळे त्यांची सत्ता संपुष्टात आली असून, हा त्यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. राहुरी पोटनिवडणुकीचा निकाल लागताच सरकारने तातडीने प्रशासक नेमल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. प्रशासक निकाळजे यांनी पदभार स्वीकारताच काल दिनाक ६ मे २०२६ बुधवारी तातडीने बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून, प्रलंबित कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.