पर्वती अत्याचार प्रकरण; अत्याचाराचा प्रयत्न करणार्याला कोठडीमहिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी महापौरांची पोलीस आयुक्तांशी चर्चा; निर्जन रस्ते, टेकड्या आ
पर्वती अत्याचार प्रकरण; अत्याचाराचा प्रयत्न करणार्याला कोठडी
महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी महापौरांची पोलीस आयुक्तांशी चर्चा; निर्जन रस्ते, टेकड्या आणि उद्यानांमध्ये सुरक्षा वाढविणार
पुणे, दि. ७ मे २०२६ : पर्वती परिसरात घडलेल्या अत्याचाराच्या प्रयत्नाच्या घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळली असून महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून पोलीसांकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी आज पोलीस आयुक्तांची भेट घेत महिला सुरक्षेबाबत सविस्तर चर्चा केली. विशेषतः निर्जन रस्ते, टेकड्या, सार्वजनिक उद्याने आणि कमी वर्दळीच्या भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
महापौरांनी सांगितले की, महिला आणि मुलींना शहरात सुरक्षित वातावरण मिळणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. पर्वतीसारख्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी तातडीने कठोर उपाययोजना करण्यात याव्यात.
बैठकीत टेकड्यांवरील गस्त वाढविणे, रात्रीच्या वेळी पोलीस पेट्रोलिंग वाढविणे, संवेदनशील भागांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, उद्यानांमध्ये सुरक्षा रक्षकांची नियुक्ती तसेच अंधार असलेल्या रस्त्यांवर प्रकाशयोजना सुधारण्याबाबत चर्चा झाली.
पोलीस आयुक्तांनीही शहरातील संवेदनशील भागांची स्वतंत्र पाहणी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. महिला सुरक्षेसाठी विशेष पथके कार्यरत करण्यात येणार असून नागरिकांनीही संशयास्पद हालचाली तात्काळ पोलिसांना कळवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर विविध सामाजिक संघटना आणि महिला संघटनांकडून निषेध व्यक्त करण्यात येत असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.