निसर्गाचा अनोखा चमत्कार! आंब्याच्या झाडाला लागलं सिताफळ
शहापूर साजिद शेख
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
भिवंडीतील एका शेतकऱ्याच्या आंब्याच्या झाडाला चक्क सीताफळ लागल्याचे पहायला मिळत आहे. आंब्याच्या झाडाला सीताफळ कसं काय लागलं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. देवाची करणी अन् नारळात पाणी ही प्रचलित म्हण आहे. परंतु असाच काहीसा चमत्कार भिवंडी-वाडा रस्त्यावरील तालुक्यातील दुगाड फाट्यानजीकच्या साईगाव, अस्नोली या ठिकाणी दिसून आलेला आहे. या विचित्र आणि आश्चर्यचकित करणाऱ्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांमध्ये उत्सुकता आणि चर्चेला उधाण आले आहे.
भिवंडी-वाडा मार्गावरील दुगाड फाट्याजवळील साईगाव, अस्नोली परिसरात राहणारे व्यावसायिक शेतकरी जयेश पटेल यांच्या घराच्या अंगणात सुमारे आठ वर्षांपूर्वी लावलेले आंब्याचे झाड आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या झाडाला आंब्यांचा बहर आला होता. मात्र याच झाडाच्या एका फांदीवर सीताफळ लागल्याचे आढळून आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ही बाब सर्वप्रथम घरातील मुलांच्या लक्षात आली. त्यांनी ही गोष्ट वडील जयेश पटेल आणि आजी जयाबेन पटेल यांना सांगितली. सुरुवातीला त्यांनी हे केवळ गैरसमज समजून दुर्लक्ष केले.
मात्र प्रत्यक्ष झाडाजवळ जाऊन पाहणी केल्यानंतर आंब्याच्या झाडावर खरोखरच सीताफळ लागल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांनाही आश्चर्य वाटले. या अनोख्या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरली. परिणामी, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने हे चमत्कारिक दृश्य पाहण्यासाठी जयेश पटेल यांच्या घराकडे गर्दी करू लागले आहेत. अनेकांनी झाडाची बारकाईने तपासणी करून कोणतेही कलम (grafting) किंवा कृत्रिम जोडणी केलेली नसल्याची खात्री करून घेतली आहे. या संदर्भात जयेश पटेल यांनी सांगितले की, आम्ही झाडावर कोणतेही कलम केलेले नाही किंवा कृत्रिमरीत्या काही चिकटवलेले नाही. हे पूर्णपणे नैसर्गिकरित्या घडलेले दिसते. त्यामुळे हा प्रकार नेमका कसा घडला, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. आंब्याच्या झाडाच्या फांदीला हे सीताफळ आल्याचे स्पष्ट पहायला मिळत आहे. हा चमत्कार नेमका कसा घडला, याचे उत्तर कदाचित विज्ञानाच्या आधारे मिळू शकेल, परंतु सध्या झाडाला लागलेले हे फळ पाहून ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करत आहेत.