विठ्ठल वाडी ते कल्याण दरम्यानमन मनोरुग्न रुग्णाच्या एसी लोकलच्या टपरावरती कसरती
शहापूर साजिद शेख
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
बदलापूर ते सीएसएमटी वातानुकूलित लोकलच्या टपावर एका तरूणाने विठ्ठलवाडी ते कल्याण रेल्वे स्थानकांच्या दरम्यान चढून थरारक कसरती केल्या. या तरूणाला विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात प्रवासी, पोलिसांनी उतरविण्याचे प्रयत्न केले, पण लोकलला उशीर होत असल्याने ही लोकल हळुहळू कल्याण दिशेने नेण्यात आली. कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे पोलीस, हमालांनी मोठ्या शर्थीने लोकलच्या टपावरून खाली उतरवले. या गोंधळामुळे या लोकलचा अर्धा तास खोळंबा झाला.
बदलापूर सीएसएमटी लोकल मंगळवारी दुपारी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात आली. त्यावेळी एक प्रवासी या उपनगरीय रेल्वेच्या खिडक्यांचा आधार घेऊन थेट टपावर जाऊन बसला. हा प्रकार प्रवाशांच्या निदर्शनास येताच, त्यांनी ओरडा करून त्या तरूणाला खाली उतरविण्यासाठी आग्रह केला. तो तरूण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तेवढ्यात लोकल सुरू झाली.
विठ्ठलवाडी ते कल्याण रेल्वे स्थानक येईपर्यंत हा तरूण लोकल डब्याच्या टपावरून बसून, तर कधी उभे राहून पादचाऱ्यांना हातवारे करत विविध प्रकारच्या कसरती करत होता.या तरूणाची माहिती विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकातून कल्याण रेल्वे स्थानकात देण्यात आली. त्यामुळे ही लोकल येणाऱ्या फलाटावर लोहमार्ग, रेल्वे सुरक्षा बळाचे पोलीस तैनात होते. कल्याण रेल्वे स्थानकात ही लोकल आल्यावर पोलिसांनी त्याला समजावून खाली उतरण्यास सांगितले. तो तरूण काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. आक्रमकपणे या तरूणाला टपावरून उतरविण्याचा प्रयत्न झाला तर तो टपावरून खाली उडी मारण्याची आणि त्याला जीवाला धोका निर्माण होण्याचा धोका होता.
त्यामुळे रेल्वे पोलिसांनी तीन हमालांना डब्याच्या भोवती उभे राहण्यास सांगितले. एक हमाल हळुहळू त्या तरूणाला समजावत डब्याच्या टपावर चढला. त्या तरूणाशी गोड़ बोलून त्याला घट्ट पकडून डब्यावरून इतर पोलीस, हमालांच्या मदतीने खाली उतरवले. हा तरूण फलाटावर उतरविल्यावर तो पोलिसांना व्यवस्थित उत्तरे देत नव्हता. त्याला आपण काही गुन्हा केला नाही याची खंत नव्हती. त्यामुळे तो मनोरुग्ण असल्याची पोलिसांना खात्री पटली. हा सगळा प्रकार पाहण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात फलाटावर गर्दी उसळली होती. हा तरूण मनोरुग्ण असल्याची खात्री पटल्यावर त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. या सर्व प्रकारामुळे लोकल अर्धा तासाचा खोळंबा झाला. या खोळंब्यामुळे प्रवासी वैतागले होते.रेल्वे फलाट, स्थानक परिसरात मनोरुग्ण, गर्दुल्ले दिसले तर पोलिसांनी त्यांना तेथून हाकलून लावावे किंवा ताब्यात घेऊन त्यांची अन्यत्र रवानगी करण्याची प्रवाशांची मागणी आहे