अहिल्यानगर महामार्गावर पुन्हा भीषण अपघात दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती, दोघे चिंताजनक
शहापूर साजिद शेख
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर वैशाखरे ते टोकावडे दरम्यान राज्य परिवहन विभागाची बस आणि एक चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती तहसिल प्रशासनाने दिली आहे. तर आणखी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. अपघातानंतर चारचाकी वाहनातील प्रवासी रस्त्यावर विव्हळत पडल्याचे भीषण दृश्य होते.
कल्याण ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरण आणि कॉंक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामामुळे या मार्गावरील वाहतूकीचा वेग वाढला आहे. त्यामुळे अनेकदा लहान मोठे अपघात होत असतात.
१३ एप्रिल रोजी याच महामार्गावर रायते येथील पुलावर एक प्रवासी व्हॅन थेट सिमेंट मिक्सला जाऊन ध़डकली होती. या भीषण अपघातात तब्बल ११ निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. यात एकाच कुटुंबातील तीन भावंडांचाही समावेश होता. तर एका शासकीय कर्मचाऱ्याचाही यात जीव गेला होता. या घटनेनंतर या मार्गावरील बेदरकार वाहनांचा प्रश्न ऐरणीवर आला होता.मात्र त्यानंतरही असाच एक अपघात झाला आहे. वैशाखरे ते टोकावडे दरम्यान हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. राज्य परिवहन मंडळाची बस आणि खासगी चारचाकीत हा अपघात झाला असून यात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती तहसिल प्रशासनाने दिली आहे. तर यात आणखी दोघे प्रवासी गंभीररित्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यातील बस ही कल्याण अहिल्यानगर असा प्रवास करणारी होती. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि स्थानिक प्रवाशांनी धाव घेतली. या चारचाकी वाहनाच्या समोरच्या बाजुचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. तर राज्य परिवहन बसचेही मोठा नुकसान झाले आहे. बसमधील प्रवाशांच्या स्थितीबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. अपघात कशामुळे झाला हेही स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र यामुळे या मार्गावरील वाहतुकही प्रभावीत झाली होती.