जामखेड : स्वस्त धान्य दुकानांमध्ये माहिती फलक नसल्याबाबत निवेदन
जामखेड : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 (NFSA) व सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) पारदर्शकता नियमांनुसार प्रत्येक स्वस्त धान्य दुकानामध्ये धान्याचे दर, उपलब्ध साठा, वितरण तारीख, लाभार्थी माहिती आणि तक्रार क्रमांक दर्शविणाऱ्या माहिती फलकांचे लावणे बंधनकारक आहे. मात्र, जामखेड तालुक्यातील अनेक स्वस्त धान्य दुकानांमध्ये हे नियम पाळले जात नसल्याचे समोर आले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ता व भारतीय पत्रकार अधिकार परिषद महाराष्ट्र राज्य सचिव रावीकुमार शिंदे यांनी तहसीलदार जामखेड यांना निवेदन देऊन संबंधित दुकानांची तपासणी करून शासन नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. निवेदनात असे नमूद केले आहे की, नागरिकांना आवश्यक माहिती उपलब्ध नसल्यामुळे सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकतेचा अभाव असून गैरप्रकार होण्याची शक्यता वाढत आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.