ऍडव्होकेट नितेश व इंजिनीरिंग प्रियंकाचा साधेपणाचा सामाजिक दायित्व असलेले आधुनिक वआदर्श विवाह
काटोल प्रतिनिधी :-
सध्या लग्न समारंभ म्हणजे मोठ्या प्रमाणावर खर्च, दिखाऊपणा आणि आडंबर यांचे प्रतीक मानले जाते. मात्र या पारंपरिक संकल्पनांना छेद देत दवडीपार येथील नितेश पतीराम मेश्राम (पेशाने वकील) आणि नागपूर येथील प्रियंका मुकुंदराव सोमकुवर (पेशाने अभियंता) या सुशिक्षित जोडप्याने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
या जोडप्याने कोणताही अनावश्यक खर्च टाळत साध्या पद्धतीने रजिस्टर मॅरेज करून विवाह संपन्न केला. विशेष म्हणजे, लग्नात वाचवलेली रक्कम त्यांनी समाजोपयोगी कार्यासाठी धम्मदान म्हणून अर्पण करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला.
या अंतर्गत त्यांनी विविध संस्थांना उदार देणगी दिली. त्रिपिटक बुद्ध विहार, दवडीपार येथे बांधकामासाठी 1,00,000, महिला वृद्धाश्रम बेला यांना 25,000, धम्म भंडार विपश्यना सेंटर भंडारा यांना 25,000, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा (वराचे गाव) यांना 25,000, जिल्हा बार असोसिएशन लायब्ररी भंडारा यांना 25,000 तसेच वधूचे मूळ गाव नरखेड तालुक्यातील थाटूरवाडा येथील बुद्ध विहारासाठी 25,000 अशी मदत करण्यात आली. ही देणगी त्यांनी स्वागत समारंभात प्रत्यक्ष दिली.
याशिवाय, भविष्यात गरीब किडनी रुग्णांच्या मदतीसाठी 50,000 आर्थिक योगदान देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे समाजात साधेपणा, सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा प्रभावी संदेश पोहोचत असून, तरुण पिढीला योग्य दिशा मिळण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, या मंगल परिणयानिमित्त आयोजित स्वागत समारंभ दवडीपार बाजार येथे अत्यंत साधेपणात आणि उत्साहात पार पडला. उपस्थितांनी या निर्णयाचे कौतुक करत नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
समाजासाठी संदेश:
लग्न हा दिखाऊपणाचा नव्हे, तर जबाबदारीचा आणि समाजसेवेचा उत्सव असावा याचे जिवंत उदाहरण म्हणजे नितेश आणि प्रियंका यांचा आदर्श विवाह.
हा विवाह समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, भविष्यात अशा उपक्रमांची परंपरा वाढीस लागावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.