अखेर बचू कडू यांच्या हातात शिंदेचा धनुष्यबाण!
Aima news.
कडू यांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळणार असल्याच्या जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात रंगू लागल्या होत्या. यासाठी बच्चू कडू प्रहार संघटनादेखील शिवसेनेत विलीन करणार असल्याचं बोललं जात होतं. यासंदर्भात बच्चू कडूंनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नेमकी भूमिका स्पष्ट केली आहे. यानंतर दुपारी पक्षप्रवेशाच्या वेळी बच्चू कडूंनी आपण आता पुढची १५-२० वर्ष जे काही राजकारण असेल, ते शिवसेनेतच राहील, असंही स्पष्ट केलं. यावेळी एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंच्या विधानपरिषद उमेदवारीचीही घोषणा केली.
आपण पक्षप्रवेशासाठी ठेवलेल्या सर्व अटी एकनाथ शिंदेंनी मान्य केल्याचं यावेळी बच्चू कडू म्हणाले. "शिवसेनेचा धनुष्यबाण मी हाती घेत आहे. आमचे सगळे मुद्दे शिवसेनेनं स्वीकारले आहेत. हमी भावातील सुधारणा, लाडक्या बहिणींमधल्या विधवा बहिणींचा मुद्दा, दिव्यांगाच्या मंत्रालयाचं बळकटीकरण हे सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतरच हा निर्णय मी घेत आहे. पण त्याबदल्यात आम्हाला शेतकऱ्यांची, दिव्यांगांची ताकद हवी आहे. त्यावर कोणतीही तडजोड होणार नाही. शिंदेंच्या नेतृत्वाखाली दिव्यांग मंत्रालय उभं राहिलं. पण त्याच्या बळकटीकरणासाठी काम झालं पाहिजे", असं ते म्हणाले.
"आज मी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शेतकरी व दिव्यांगांसाठी हा धनुष्यबाण मी उचलला आहे असे ते म्हणाले.