logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

वाशीम तालुक्यातील भटउमरा येथे नववधू वैष्णवी काळे ने शिक्षणाला प्राधान्य देत लग्न मंडपातून थेट परीक्षेला दिले प्राधान्य

"आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या लग्नाच्या दिवशीही शिक्षणाला प्राधान्य देत थेट लग्न मंडपातून परीक्षेला हजेरी लावून एक आदर्श निर्माण"

(वैष्णवीला पारंपरिक वेशभूषेत नववधू परीक्षा देताना पाहून परीक्षा केंद्रातील विद्यार्थी व शिक्षकही आश्चर्यचकित झाले)


वाशीम, प्रतिनिधी दि. 28 एप्रिल 2026 रोजी,
वाशीम तालुक्यातील ग्राम भटउमारा येथील एक प्रेरणादायी घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. समाजकार्याचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी आणि नववधू कु. वैष्णवी संतोष काळे हिने आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या दिवशी—लग्नाच्या दिवशीही—शिक्षणाला प्राधान्य देत थेट लग्न मंडपातून परीक्षेला हजेरी लावून एक आदर्श निर्माण केला आहे.
दि. 28 एप्रिल 2026 रोजी वैष्णवीचा विवाह ज्ञानेश्वर राजू चौधरी (रा. भटउमारा) यांच्याशी मोठ्या उत्साहात पार पडत होता. लग्नाच्या विधी सुरू असतानाच, ठरलेल्या वेळेत परीक्षा देणे आवश्यक असल्यामुळे वैष्णवीने कोणतीही तडजोड न करता मंडपातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पारंपरिक लग्नाच्या वेशभूषेतच ती वाशीम येथील राजस्थान महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर पोहोचली आणि आपली परीक्षा दुपारी 2 ते 5 या वेळेत दिली.
पारंपरिक वेशात नववधू परीक्षा देताना पाहून परीक्षा केंद्रातील विद्यार्थी व शिक्षकही आश्चर्यचकित झाले. तिच्या या जिद्दीचे आणि शिक्षणावरील निष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनेकांनी या घटनेला “शिक्षण प्रथम” या विचाराचे उत्तम उदाहरण म्हणून गौरवले आहे.
वैष्णवीच्या या कृतीने समाजासमोर एक सकारात्मक संदेश गेला असून, विशेषतः महिलांसाठी ती प्रेरणादायी ठरली आहे. कोणत्याही परिस्थितीत शिक्षणाला प्राधान्य द्यावे, हे तिने कृतीतून दाखवून दिले आहे. आजही अनेक ठिकाणी मुलींच्या शिक्षणाकडे दुय्यम नजरेने पाहिले जाते, अशा परिस्थितीत वैष्णवीसारख्या तरुणींची उदाहरणे समाजात बदल घडवून आणणारी ठरत आहेत. यावेळी वैष्णवी ने सांगितले की "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही " बाबासाहेब दिलेला संदेश आणि अधिकार अंगी कारून,राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले त्यांचे विचार वारसा या शिक्षणाच्या माध्यमातून नेण्याचा मानस असल्याचे सांगितले. वैष्णवी ही वाशिम येथील श्री.रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयाची बीए.स.डब्ल्यू भाग तीन चि विद्यार्थिनी असून तिने समाजकार्याच्या शिक्षणाला प्राधान्य देत आज लग्नाच्या दिवशीही तिने पेपरला हजेरी लावली आहे. ही शिक्षणाचे महत्त्व निर्णय घेण्याची क्षमता आणि ताकद दाखवून दिली आहे. स्थानिक नागरिक, शिक्षक व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी वैष्णवीच्या या निर्णयाचे मनापासून कौतुक केले. असून, तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वैष्णवी आणि तिचे आई वडील,झालेला पती, सासू - सासरे नातेवाईक यांच्या धाडसी आणि सकारात्मक कृतीमुळे भटउमारा गावाचे नावही अभिमानाने घेतले जात आहे.

0
0 views

Comment