logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पाथर्डी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात; ५ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक

अहिल्यानगर:
अपघातातील जप्त केलेली दुचाकी सोडण्यासाठी आणि कोर्टाच्या कामात मदत करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पाथर्डी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.तक्रारदार यांचा मार्च महिन्यात मढी गावाजवळ मोटारसायकलचा अपघात झाला होता. याप्रकरणी २४ एप्रिल रोजी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. २८ एप्रिल रोजी बीट हवालदार अभय लबडे यांनी तक्रारदाराला पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची गाडी जमा करून घेतली होती.
ही गाडी सोडण्यासाठी आणि लायसन्स असलेल्या ड्रायव्हरला तपासात दाखवून कोर्टाच्या कामात मदत करण्यासाठी हवालदार लबडे यांनी ७ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ५ हजार रुपये देण्याचे ठरले.तक्रारदाराने याप्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. २९ एप्रिल रोजी पडताळणी केल्यानंतर आज, ३० एप्रिल २०२६ रोजी पोलीस ठाण्याच्या बीट अंमलदार कक्षात सापळा रचण्यात आला.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१) अभयसिंह काकासाहेब लबडे (वय ४०) – पोलीस हवालदार, पाथर्डी पोलीस स्टेशन.
२) ज्ञानेश्वर मारुती सानप (वय ३६) – पोलीस नाईक (बीट मदतनीस), पाथर्डी पोलीस स्टेशन.
हवालदार लबडे यांनी लाचेची ५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारून ती ज्ञानेश्वर सानप यांच्याकडे दिली. याच वेळी एसीबीच्या पथकाने दोघांनाही रंगेहात ताब्यात घेतले. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

48
2308 views

Comment