शहादा येथे २० हजारांची लाच घेताना कंत्राटी अभियंत्यासह तीन जणांवर गुन्हा
शहादा : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक वस्ती विकास योजनेच्या प्रशासकीय मंजुरीच्या आदेशाची प्रत देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना शहादा येथील कंत्राटी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी समाज कल्याण विभागातील एका वरिष्ठ सहायक लेखा सहायकासह अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल झाला.
भूपेंद्र सरचंदराव राठोड (३१) कंत्राटी अभियंता, पंचायत समिती शहादा
(ग्रामीण गृहनिर्माण), रमेश मन्साराम बागुल (५६) वरिष्ठ सहायक, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार. चंद्रेश जगजीवनदास शहा (५१) सहायक लेखा अधिकारी, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
तक्रारदाराने कुकावल (ता. शहादा) येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामासाठी जिल्हा परिषद, नंदुरबार येथे प्रस्ताव सादर केला होता. या कामासाठी ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी २ लाख
रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, या मंजुरीच्या प्रशासकीय आदेशाची प्रत समाज कल्याण विभागातील वरिष्ठ सहायक रमेश बागुल याने कंत्राटी अभियंता भूपेंद्र राठोड याच्याकडे परस्पर देऊन टाकली होती.
तक्रारदाराने रमेश बागुल यांची भेट घेतली, तेव्हा बागुल यांनी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची मागणी केली राठोड याच्याकडे पैसे देऊन आदेशाची प्रत घेण्यास सांगितले. या मागणीला सहायक लेखा अधिकारी चंद्रेश शहा यांनी प्रोत्साहन दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला.