प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन; 14 मेपासून टप्प्याटप्प्याने लढा
महाराष्ट्रातील राज्य शासकीय विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसंदर्भात अनेक वेळा निवेदने देऊन तसेच मंत्रालयात प्रत्यक्ष भेटी घेऊनही शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य सेवक संयुक्त कृती समितीने केला आहे. त्यामुळे प्रलंबित मागण्यांसाठी समितीने आंदोलनाची भूमिका घेतली असून दि. 14 मे 2026 पासून सनदशीर मार्गाने विविध टप्प्यांत आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष अजय देशमुख यांनी दिली.
सोमवार दि. 27 एप्रिल रोजी जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात महाराष्ट्र राज्य सेवक संयुक्त कृती समितीची बैठक पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी अजय देशमुख होते. यावेळी विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
दि. 2 मार्च 2026 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या बैठकीतही आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शासनास निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने जळगाव येथील बैठकीत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सातव्या वेतन आयोगानुसार 10, 20 व 30 वर्षांनंतरची आश्वासित प्रगती योजना तात्काळ लागू करणे, 2005 पूर्वी जाहिरात प्रक्रिया पूर्ण झालेल्या पण नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, अ-कृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरण अंतिम वेतनानुसार देणे, रिक्त पदे तात्काळ भरणे, प्रयोगशाळा सहाय्यक व परिचारकांना रजा रोखीकरणाचा लाभ पुन्हा सुरू करणे तसेच सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे या मागण्यांचा समावेश आहे.
समितीने जाहीर केलेल्या आंदोलनाच्या टप्प्यांनुसार दि. 14 मेपासून काळ्या फिती लावून काम, दि. 17 मे पासून दुपारच्या सुट्टीत निदर्शने व घोषणाबाजी, दि. 21 मे रोजी राज्यव्यापी एकदिवसीय लेखणी बंद आंदोलन, दि. 25 मे रोजी विभागीय सहसंचालक कार्यालयासमोर धरणे, दि. 28 मे रोजी लाक्षणिक कामबंद आंदोलन आणि दि. 4 जूनपासून बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे.
बैठकीस अजय देशमुख, मिलिंद भोसले, रावसाहेब त्रिभुवन, दिनेश दखणे, सतीश वाघमारे, केतन कान्हेरे, प्रेम मडपे, संदीप हिवरकर, अरुण सपकाळे, राजू सोनवणे, गोपाल सोनवणे यांच्यासह अमरावती, नागपूर, पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर व जळगाव येथील विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेचे आयोजन उत्तर महाराष्ट्र मागासवर्गीय कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आले. सभेच्या यशस्वी आयोजनासाठी राजू सोनवणे, जयवंत सोनवणे, भारत उपाडे, विठ्ठल धनगर, दीपक गावित, विकास बिराडे, रेखा धम्मरत्न, नीता शिंदे, अभिमन्यू पवार, सुभाष पवार, राहुल नन्नवरे, स्नेहल कुंवर आदींनी परिश्रम घेतले.