राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेचे अनुदान रखडले; हजारो शेतकरी गंभीर आर्थिक संकटात......?
अमरावती मेलघाट (विशेष प्रतिनिधी):
शेतीतील कष्ट कमी व्हावेत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा यासाठी राज्य शासनाने मोठ्या गाजावाजा करत 'राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना' राबवली. मात्र, या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर आणि इतर शेती अवजारे खरेदी करूनही राजभरातील हजारो शेतकऱ्यांना अद्याप अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. यामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक शेतकऱ्यांनी बँकांकडून किंवा खाजगी सावकारांकडून कर्ज काढून कृषी यंत्रांची खरेदी केली होती. शासनाचे अनुदान जमा झाल्यावर हे कर्ज फेडता येईल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, महिनोनमहिने उलटून गेले तरी खात्यात अनुदानाची रक्कम जमा न झाल्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचे हप्ते आणि व्याजाचा डोंगर वाढत आहे.
"कर्ज काढून ट्रॅक्टर घेतला, पण अनुदानाचे पैसे अजून आले नाहीत. आता बँकेचे हप्ते कसे भरायचे आणि घर कसे चालवायचे, हा मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे," अशी व्यथा एका त्रस्त शेतकऱ्याने मांडली.
एकीकडे निसर्गाचा लहरीपणा आणि दुसरीकडे सरकारी लालफीतशाही, यामुळे शेतकरी पुरता कोलमडून गेला आहे. राज्य सरकारने तातडीने लक्ष घालून प्रलंबित अनुदानाची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी तीव्र मागणी आता राज्यभरातून जोर धरू लागली आहे. सरकारने वेळीच पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकरी संघटनांनी दिला आहे.