logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम नागरिकांच्या सन्मानाचा भक्कम पाया – अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिन उत्साहात साजरा.


अहिल्यानगर, दि. २८ महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ हा नागरिकांच्या सन्मानाचा व त्यांच्या हक्कांचा भक्कम पाया असून या कायद्यामुळे शासनाच्या सेवा नागरिकांना हक्काने मिळण्याची हमी मिळाली आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र लोकसेवा हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अपर जिल्हाधिकारी हिंगे म्हणाले, "विविध विभागांच्या शेकडो सेवा अधिसूचित करण्यात आल्या असून त्या निश्चित कालावधीत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. 'आपले सरकार' पोर्टलमुळे अनेक सेवा घरबसल्या उपलब्ध झाल्या असून शासन आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी झाले आहे. जिल्ह्यात या सेवांच्या अंमलबजावणीत महसूल विभाग आघाडीवर असून सेवा अत्यंत जलदगतीने दिल्या जात आहेत."

ते पुढे म्हणाले, "कायद्याच्या मूळ उद्देशानुसार जिल्ह्यातील विविध विभागांनी प्रभावी अंमलबजावणी केली आहे. आगामी काळात या सेवांचा अधिक विस्तार होणार असून नागरिकांना अधिक जलद आणि कार्यक्षम सेवा देण्याचा प्रयत्न केला जाईल. अधिसूचित सेवांबरोबरच इतर सेवांमध्येही अनेक अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे," असे त्यांनी सांगितले.

निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते म्हणाले, "सेवा ही केवळ जबाबदारी नसून ती आपली बांधिलकी आहे. प्रत्येक अर्जामागे नागरिकांचा विश्वास आणि अपेक्षा दडलेल्या असतात. त्यामुळे नागरिकांना केंद्रबिंदू मानून त्यांना वेळेत आणि गुणवत्तापूर्ण सेवा देणे आवश्यक आहे. नागरिकांनीही या कायद्याचा प्रभावी वापर करून आपल्या हक्कांची जाणीव ठेवावी आणि आवश्यकतेनुसार अपील प्रक्रियेचा उपयोग करून न्याय मिळवावा."

ते पुढे म्हणाले, "या कायद्याचा महत्त्वाचा पैलू म्हणजे उत्तरदायित्व असून सेवा देण्यात झालेल्या विलंबाबद्दल संबंधित अधिकाऱ्यांवर दंडाची तरतूद आहे. त्यामुळे प्रशासन अधिक जबाबदार आणि पारदर्शक झाले आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग 'आपली सेवा, आमचे कर्तव्य' या ब्रीदवाक्याद्वारे नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करत आहे."

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत अधिसूचित सेवांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, अरुण उंडे, माणिक आहेर तसेच तहसीलदार उद्धव नाईक, अमोल मोरे, आकाश दहाडदे, धीरज मांजरे आणि रवी सतवन यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. तसेच रोहित शिंदे, संतोष खैरनार व रविंद्र मां गुळकर यांचाही उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने झाली, तर सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागूल यांनी केले.

3
1489 views

Comment