महाराणी राजमाता हिराई पुतळ्यासाठी जागेची मागणी; १ कोटी निधी घोषणेनंतर हालचालींना वेग
प्रतिनिधी : आकाश गेडाम
चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांनी महाराणी राजमाता हिराई यांच्या पुतळा उभारणीसाठी १ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केल्यानंतर या उपक्रमाला गती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी संघटना तसेच भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगर यांच्या वतीने जिल्हाधिकारी वसुमना पंत यांना निवेदन देऊन पुतळ्यासाठी योग्य व मध्यवर्ती जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
या निवेदनावेळी विविध संघटना व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. यात भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडीचे अध्यक्ष तथा नगरसेवक जितेश कुळमेथे, नगरसेविका सरला कुळसंगे, जनसेवा गोंडवाना पार्टीचे धीरज शेडमाके, गोंडवाना विद्यार्थी संघटनेचे सारंग कुमरे, आक्रोड संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय कुमरे, अखिल भारतीय आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा मसराम, आदिवासी टायगर सेना जिल्हा महासचिव अविनाश मडावी यांच्यासह इतर मान्यवरांचा समावेश होता.
निवेदनात नमूद करण्यात आले की, चंद्रपूर जिल्ह्याला गोंड राजांचा समृद्ध इतिहास लाभलेला असून महाराणी राजमाता हिराई यांचे शौर्य व योगदान अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मृती जतन करून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शहरात भव्य पुतळा उभारणे गरजेचे आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांनी यासाठी पुढाकार घेत १ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली असल्याने प्रशासनाने तातडीने योग्य जागा उपलब्ध करून देऊन कामाला गती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, पुतळा अशा ठिकाणी उभारावा जिथे नागरिकांना सहज भेट देता येईल, जेणेकरून आदिवासी समाजाचा इतिहास व शौर्यगाथा अधिक प्रभावीपणे जनतेसमोर येईल, असेही निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.