logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जिल्हा परिषदेचे विद्यार्थी राहणार इस्रोत! मला पण व्हायचंय अंतराळवीर

शहापूर साजिद शेख
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जिद्द, गुणवत्ता आणि कल्पकतेला योग्य व्यासपीठ मिळाल्यास तेही आकाशाला गवसणी घालू शकतात. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ‘मिशन भरारी’ उपक्रमातून ठाणे जिल्ह्यातील पाचवी ते आठवी इयत्तेच्या ५९ विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) भेटीसाठी निवड झाली आहे. या भेटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संशोधन, ऐतिहासिक मोहीमेची माहिती दिली जाणार आहे.

मिशन भरारी या उपक्रमांतर्गत केंद्र, तालुका आणि जिल्हास्तरावर निवड चाचण्या घेण्यात आल्या. त्यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विमानाने कन्याकुमारी आणि तिरुअनंतपुरम येथील इस्रो केंद्रांना भेट देण्याची संधी देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेकडून नुकतीच अंतिम यादी जाहीर करण्यात आली असून, त्यामध्ये शहापूर तालुक्यातील शेलवली (बांगर), अस्नोली, आष्टे, मुगाव, खराडे, धसई आणि कळमपाडा येथील ११ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच अंबरनाथ येथील १६, भिवंडीतील १२, कल्याणमधील १० आणि मुरबाडमधील १० विद्यार्थी अंतिम यादीत आहेत.निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इस्रोच्या संशोधन केंद्रांना प्रत्यक्ष भेट देत उपग्रह, रॉकेट, प्रक्षेपण यंत्रणा यांविषयी माहिती घेण्याची तसेच शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय चांद्रयान व मंगळयानसारख्या ऐतिहासिक मोहिमांची माहिती, संशोधन प्रयोगशाळांचे प्रत्यक्ष दर्शन आणि भविष्यातील अंतराळ संशोधनाच्या दिशा समजून घेण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

ही शैक्षणिक सहल २७ एप्रिल ते १ मे या कालावधीत आयोजित करण्यात आली असून, विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी शहापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी हिराजी वेखंडे यांच्या नेतृत्वाखाली शेलवली (बांगर) येथील शिक्षक सुधाकर पाटील आणि शिक्षण विस्तार अधिकारी संगीता माळी यांची निवड करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रथमच अशी संधी मिळाल्याने पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव आणि शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तो महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

13
321 views

Comment