सातववाडी (हडपसर) येथे मोठे झाड कोसळले; मोठा अपघात टळला
पुणे, ता. २६ — हडपसर परिसरातील सातववाडी येथे काल रात्री अचानक एक मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठा अपघात होता होता टळला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस मित्र संघटना, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष श्री. किशोर गायकवाड आणि श्री. महेश कडडेकर यांनी तात्काळ पोलिस व फायर ब्रिगेडला कळवले. संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनीही दोन तास घटनास्थळी थांबून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत केली.
फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी पडलेले झाड हटवून रस्ता मोकळा केला, त्यामुळे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. स्थानिक नागरिकांनी वेळेवर मदत केल्याबद्दल संबंधितांचे आभार मानले.