प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठ सेवक आक्रमक; सोमवारी निर्णयात्मक बैठक, आंदोलनाचे रणशिंग फुंकणार
महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवकांच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती आक्रमक झाली आहे. आंदोलनाची पुढील दिशा व धोरण ठरवण्यासाठी सोमवार, दि. 27 एप्रिल रोजी जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सर्व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
यापूर्वी दि. 2 मार्च 2026 रोजी पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बैठक पार पडली होती. त्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र, या निवेदनाची शासनाकडून कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात आली नसल्याने विद्यापीठीय व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
तीन लाभांच्या आश्वासित प्रगती योजनेसह इतर विविध प्रलंबित प्रश्नांवर आता प्रत्यक्ष आंदोलन सुरू करण्याच्या दृष्टीने या बैठकीत सखोल चर्चा होणार असून आंदोलनाचा आराखडा निश्चित करण्यात येणार आहे.
या महत्त्वाच्या बैठकीस महाराष्ट्र राज्यातील अकृषी विद्यापीठांतील कर्मचाऱ्यांच्या घटक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.