तक्रारवाडी टोल नाक्यावर जनतेचा प्रचंड एल्गार!
टोलमाफीसाठी जनआंदोलन उफाळले; “निर्णय घ्या, अन्यथा टोल नाका बंद पाटू!” इशारा
पुरंदर प्रतिनिधी (प्रतिनिधी) – जेजुरीजवळील तक्रारवाडी येथील टोल नाक्यावर स्थानिक नागरिकांनी अभूतपूर्व एकजूट दाखवत टोलमाफीच्या मागणीसाठी तीव्र आणि व्यापक जनआंदोलन उभारले. दैनंदिन कामानिमित्त प्रवास करणाऱ्या शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांवर टोलचा वाढता आर्थिक बोजा पडत असल्याने संतापाची लाट उसळली असून, या रोषाचा उद्रेक आंदोलनाच्या रूपाने झाला आहे.
तक्रारवाडी, जेजुरी, सासवड, बेलसर, शिवरी ,वाळूज ,निळुज,साक्रुडे ,खळद,परिसरातील अनेक गावांतील नागरिक मोठ्या संख्येने टोल नाक्यावर एकत्र जमले. ठिय्या आंदोलन करत “स्थानिकांना टोलमाफी मिळालीच पाहिजे”, “आमच्या हक्काचा रस्ता टोलमुक्त करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, युवक व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
स्थानिक नागरिकांनी स्पष्ट केले की, रोजच्या प्रवासासाठी वारंवार टोल भरणे परवडणारे नसून त्यामुळे त्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे. शाळा, रुग्णालय, बाजारपेठ यांसारख्या अत्यावश्यक सेवांसाठीही टोल भरावा लागणे अन्यायकारक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य अजय कैलासबापू इंगळे यांनी अत्यंत कडक आणि ठाम भूमिका मांडत प्रशासनाला थेट इशारा दिला. “गेल्या महिनाभरापासून तक्रारवाडी टोलप्रश्नी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. हा फक्त टोलचा विषय नाही, तर पुरंदरच्या शेतकरी, कष्टकरी कामगार आणि विद्यार्थ्यांच्या जगण्याचा प्रश्न आहे. स्थानिक नागरिकांवर आर्थिक अन्याय लादणारा हा टोल आम्ही कदापि सहन करणार नाही. आम्ही NHAI कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला असून, ‘स्थानिकांना टोलमुक्त ठेवा’ ही मागणी ठामपणे मांडली आहे.”
ते पुढे म्हणाले, “या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडेही पत्रव्यवहार करून पुरंदरची परिस्थिती स्पष्ट केली आहे. तरीही जर प्रशासनाने वेळेत सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर जनतेच्या भावनांचा उद्रेक अधिक तीव्र होईल. गरज पडल्यास तक्रारवाडी टोल नाका पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. पुरंदरच्या स्वाभिमानाशी तडजोड होऊ देणार नाही — हा लढा संजय जी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शेवटपर्यंत सुरू राहील!”
टोलमाफीच्या मागणीसाठी संबंधित टोल प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले असून, निर्णयासाठी अल्प मुदत देण्यात आली आहे. ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन आणखी उग्र होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
या तीव्र जनआंदोलनामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, आता पुढील निर्णयाकडे संपूर्ण पुरंदर तालुक्याचे लक्ष लागले आहे.