हिडमा गाण्यावर नृत्य केल्यामुळे दोन आदिवासी विद्यार्थ्यांवर गुन्हा; गुन्हे मागे न अन्यथा, राज्यात आंदोलनाचा इशारा - आदिवासी टायगर सेना
हिडमा गाण्यावर नृत्य केल्यामुळे दोन आदिवासी विद्यार्थ्यांवर गुन्हा; गुन्हे मागे न अन्यथा, राज्यात आंदोलनाचा इशारा - आदिवासी टायगर सेना
आकाश गेडाम : प्रतिनिधी
महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विश्रांतवाडी, पुणे येथील वसतीगृहात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात “हिडमा” या गाण्यावर नृत्य सादर केल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील दोन आदिवासी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
किरण गोमासे आणि श्रीनिवास कुमरी हे दोन्ही विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी पुण्यात वास्तव्यास असून, त्यांनी आपल्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी नृत्य सादर केले होते. मात्र, या कृतीवर गुन्हा दाखल झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर अशा प्रकारे गुन्हे दाखल करून त्यांच्या भविष्यास बाधा आणण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू आहे. जर नृत्य सादर केल्याबद्दल गुन्हा दाखल होत असेल, तर संबंधित गाणे तयार करणारे आणि ते सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांवर किती कारवाई करण्यात आली आहे, असा सवाल आदिवासी टायगर सेनेने उपस्थित केला आहे.
या प्रकरणी आदिवासी टायगर सेनेच्या वतीने मा. मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले असून, संबंधित विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
या निवेदनावर विदर्भ महिला अध्यक्षा मीनल ताई आत्राम, जिल्हा अध्यक्ष ड्रेफूल आत्राम, सुमित्रा आलाम, विदर्भ युवा अध्यक्ष अभिलाष परचाके, जिल्हा उपाध्यक्ष संगीता येरकाडे, जिल्हा सचिव रेखा सोरते, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख वर्षा आत्राम, चंद्रपूर तालुका अध्यक्ष माणिक जुमनाके, गोंडपिपरी तालुका अध्यक्ष गणेश कोवे तसेच शेकडो कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या असून, जिल्हाधिकारी, चंद्रपूर मार्फत हे निवेदन पाठविण्यात आले आहे