मोहगाव (भदाडे) येथेल नामदेवरावजी कामडी यांच्या शेतातील गोठ्याला आग; लाखोंचे नुकसान..!
काटोल (प्रतिनिधी) – नरखेड तालुक्यातील मोहगाव (भदाडे) येथील शेतकरी नामदेवराव कामडी यांच्या शेतातील जनावरांच्या गोठ्याला अचानक आग लागून सुमारे २.५ ते ३ लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मौजा खुटखैरी येथील शेतात असलेल्या गोठ्याला लागलेल्या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, ही घटना संशयास्पद असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच नरखेड तहसीलदार यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता, त्यांनी उद्या पटवारी व कोतवाल यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा करण्यात येईल, असे सांगितले.
दरम्यान, नामदेवराव कामडी यांचे नुकतेच दवाखान्यात ऑपरेशन झाले असून, ते अजूनही पूर्णपणे सावरलेले नाहीत. अशा परिस्थितीत या आगीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे ते हतबल झाले आहेत.
स्थानिक नागरिकांकडून शासनाने तात्काळ पंचनामा करून संबंधित शेतकऱ्यास योग्य ती आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.