ठाण्यातील आदिवासी पाड्यात भीषण तीव्र पाणीटंचाई
शहापूर साजिद शेख/
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यातील शहापूर भागात उन्हाळ्यामध्ये भीषण पाणी टंचाई होत असते. तेथील रहिवाशांना झरे, डबक्यातून पाणी आणण्याची वेळ येते. परंतु हीच स्थिती ठाणे शहरातील आदिवासी पाड्यांमध्ये निर्माण झाली आहे. तीन ते चार दिवस तर कधी एक आठवडा या भागात पाणी उपलब्ध होत असल्याने पाण्याविना येथील रहिवासी हैराण झाले आहेत.
घोडबंदर भागात पूर्वी आदिवासी पाडे होते. मागील २० ते २५ वर्षामध्ये या भागात बांधकाम व्यवसायिकांनी टाॅवर बांधले. त्यामुळे घोडबंदर भागात नागरी वस्त्या वाढल्या. असे असले तरी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसर किंवा डोंगराच्या पायथ्याशी आदिवासी पाडे आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्याना जवळील कासारवडवली येथील बोरिवडे परिसरात भीषण पाणी टंचाईन निर्माण झाली. या भागात ८०० जणांची वस्ती असलेला आदिवासी पाडा आहे. ठाणे महापालिकेकडून पाणी पुरवठा होत होता. पाणी टंचाई निर्माण झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी येथील नागरिकांना वणवण करावी लागत आहे. ठाणे शहरात असूनही अशी परिस्थिती असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या भागात अनेकदा तीन ते चार दिवसांतून २० मिनीटे किंवा कधी-कधी आठवड्यातून २० मिनीटे पाणी मिळते.
अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे महिलांना पाण्यासाठी झरे किंवा डबके शोधावे लागतात. डबक्यातील गढूळ, दुषित पाणी प्यावे लागत आहे. दुषित पाण्यामुळे गंभीर आजार झाल्यास कोण जबाबदार असा प्रश्न येथील रहिवासी विचारत आहेत.आठवड्यातून एकदा फक्त २० मिनीटे पाणी मिळत आहे. रहिवाशांचे प्रचंड हाल झाले असून झरे, डबक्यांतून पाणी आणावे लागते. ठाण्यासारख्या शहरात ही अवस्था झाली तर ग्रामीण भागात काय स्थिती असेल. – वसंत गावित, रहिवासी, बोरिवडे.