logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

कास पठार–घाटाई फाटा–सातारा रोडवर धोकादायक स्पीड ब्रेकर; अपघातांत वाढ, ठेकेदार व PWD वर गंभीर आरोप — छत्रपती संघटना आक्रमक कास पठार ते घाटाई फाटा आणि प

कास पठार–घाटाई फाटा–सातारा रोडवर धोकादायक स्पीड ब्रेकर; अपघातांत वाढ, ठेकेदार व PWD वर गंभीर आरोप — छत्रपती संघटना आक्रमक
कास पठार ते घाटाई फाटा आणि पुढे सातारा रोड या अत्यंत महत्त्वाच्या मार्गावर उभारण्यात आलेल्या स्पीड ब्रेकरमुळे अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदाराचा मनमानी कारभार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) निष्काळजीपणावर स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या रस्त्यावर अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आले असून, काही ठिकाणी ते अत्यंत उंच व धोकादायक आहेत. विशेष म्हणजे, बहुतांश स्पीड ब्रेकरवर कोणतेही सूचना फलक, रिफ्लेक्टर किंवा पांढरे मार्किंग नसल्याने वाहनचालकांना ते अचानक समोर येतात. त्यामुळे विशेषतः दुचाकीस्वारांचे संतुलन बिघडून अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, संबंधित ठेकेदाराने काम करताना कोणतेही तांत्रिक नियम किंवा मानके पाळलेली नाहीत. तसेच, सार्वजनिक बांधकाम विभागानेही या कामाकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे. परिणामी, नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे.
रात्रीच्या वेळी किंवा कमी प्रकाशात हे स्पीड ब्रेकर अधिकच घातक ठरत असून, वाहनचालकांना अचानक धक्का बसल्याने अनेकदा गंभीर अपघात घडत आहेत. “अचानक समोर येणारे स्पीड ब्रेकरमुळे काय घडते आहे हे समजण्याच्या आतच अपघात होतो,” अशी प्रतिक्रिया काही वाहनचालकांनी दिली.
दरम्यान, या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी छत्रपती संघटना आक्रमक झाली असून, तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे. चुकीच्या पद्धतीने बांधलेले स्पीड ब्रेकर हटवून नियमांनुसार नवीन स्पीड ब्रेकर उभारावेत, तसेच योग्य त्या सूचना फलक, रिफ्लेक्टर व रंगकाम करण्यात यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.
याबाबत लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही छत्रपती संघटनेने दिला आहे. आता प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0
47 views

Comment