logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पूर्व भागातील गावांचे भारनियमन तात्काळ रद्द करा; अन्यथा उपोषणाचा इशारा

पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावांमध्ये सध्या सुरू असलेल्या अनियमित व दीर्घकाळ चालणाऱ्या वीज भारनियमनामुळे नागरिक त्रस्त झाले असून संतापाची लाट उसळली आहे. सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत होणाऱ्या वीज कपातीमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, व्यावसायिकांचे कामकाज आणि शेतकऱ्यांचे शेती व्यवस्थापन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यामुळे हे अन्यायकारक भारनियमन तात्काळ रद्द करण्याची जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी एकत्र येत महावितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य अजय कैलासबापु इंगळे तसेच माळशिरस गणातील पंचायत समिती सदस्य माऊली यादव उपस्थित होते. त्यांनी नागरिकांच्या मागण्यांना पाठिंबा देत प्रशासनाने तात्काळ ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. तसेच १५ दिवसांच्या आत भारनियमन रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा आणि उपोषणाचा इशारा देण्यात आला.

नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले की, सध्याच्या भारनियमनामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर गंभीर परिणाम होत असून परीक्षांच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिक तीव्र झाली आहे. तसेच शेती पाणीपुरवठा, दूध व्यवसाय, छोटे उद्योग आणि दुकानदारांचे व्यवहारही ठप्प होत आहेत. वाढत्या उष्णतेत वीज नसल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल अपरिमित होत आहेत.

दरम्यान, काही ठिकाणी वीज चोरी आणि अनधिकृत वापरामुळेच भारनियमन वाढल्याची बाब पुढे आली असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. प्रामाणिकपणे बिल भरणाऱ्या ग्राहकांवर अन्याय होऊ नये, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.

महावितरण अधिकाऱ्यांनी समस्येची दखल घेत लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असले तरी, ठोस निर्णय न झाल्यास येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

24
5191 views

Comment