logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

राष्ट्रीय पोषण पंधरवड्यात अहिल्यानगर जिल्हा देशात प्रथम



अहिल्यानगर, दि. २० एप्रिल महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या आठव्या राष्ट्रीय पोषण पंधरवड्यातील जनजागृती उपक्रमांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ९ एप्रिल ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये हे उपक्रम राबविले जात आहेत. अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय कदम यांनी दिली.

या पंधरवड्यात आतापर्यंत तीन लाख चोवीस हजार पंचाहत्तर उपक्रम नोंदवून अहिल्यानगर जिल्ह्याने देशात आघाडी घेतली आहे, तर पुणे जिल्हा दुसऱ्या व बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. या पंधरवड्याचे राष्ट्रीय स्तरावरील उद्घाटन केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री यांच्या हस्ते वेबकास्टद्वारे झाले. जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या हस्ते या उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.

बालकाच्या आयुष्यातील पहिली सहा वर्षे पोषण व शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. याच अनुषंगाने बालकांच्या जीवनातील पहिल्या सहा वर्षांतील मेंदूचा विकास या मुख्य संकल्पनेवर यंदाचा पंधरवडा केंद्रित आहे. यामध्ये माता व बालकांचे पोषण, शून्य ते तीन वर्षे वयोगटातील बालकांच्या मेंदूच्या विकासाकरिता पूर्व उद्दीपन, तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुलांसाठी खेळ आधारित पूर्व शालेय शिक्षण, बालकांचा स्क्रीन वेळ कमी करण्यासाठी पालकांची भूमिका व अंगणवाडी केंद्र सक्षम करण्यासाठी समुदायाचा सहभाग वाढविणे या प्रमुख विषयांवर विशेष भर दिला जात आहे.

गाव पातळीवर आरोग्य, शालेय शिक्षण, ग्रामविकास व इतर संबंधित विभागांच्या समन्वयाने हे अभियान राबविले जात आहे. ग्रामपंचायत व अंगणवाडी स्तरावर मशाल फेरी, पाककृती स्पर्धा, पोषण रॅली, माता-बालक आरोग्य मार्गदर्शन शिबिरे, आहार प्रात्यक्षिके, गृहभेटी तसेच पालक बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये महिला, पालक व स्थानिक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले आहे.

#PoshanPakhwada2026 #NationalNutritionMission #AhilyanagarFirst #SanjayKadam #AnandBhandari #EarlyChildhoodDevelopment #WCDMaharashtra #NutritionAwareness #AnganwadiPower #BrainDevelopment #HealthyIndia #PuneSecond #SuccessStory #अहिल्यानगर #पोषण_पंधरवडा #देशात_प्रथम #महिला_व_बालविकास #आरोग्यसंपन्न_भारत

7
4556 views

Comment