logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

ठाणे रेल्वे स्थानकात तरुणाचा मृत्यू; पत्नीला लेडीज डब्यात बसवलं लोकल पकडताना लोकलमधून खाली पडला

रेल्वे प्रवास करताना काळजी घ्यावी न घेतल्यास अपघाताचे गंभीर प्रकार यापूर्वीही अनेकदा घडले आहेत. असाच एक दुर्दैवी अपघात ठाणे रेल्वे स्थानकावर लोकलमधून पडल्याने झाला असून यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील युवकाचा मृत्यू झाला आहे. तेजस उदय पवार (३०, सध्या रा. दिवा मुंबई) असं या युवकाचं नाव आहे. पत्नीला महिलांच्या सुरक्षित डब्यात बसवले आणि स्वतः दुसऱ्या डब्यात जात असताना गर्दी वाढली आणि तेजस बाहेर फेकला गेला. या अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या तेजस याचा मृत्यू झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तेजस हा मूळचा देवगड येथील असून त्याच्या काकांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. दिवंगत काकांच्या दिवसकार्याला जात असताना तेजससोबत लोकलमध्ये विपरीत घटना घडली. गुरुवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वे स्टेशन येथील अपघातात तेजनसे प्राण गमावले. रामेश्वर येथील जि. प. च्या माजी सदस्या वर्षा पवार यांचा तो मुलगा आहे.

तेजस हा मुंबई येथे खासगी कंपनीत कामाला होता. दीड वर्षापूर्वी त्याचा विवाह झाला होता. तो सध्या दिवा येथे पत्नीसमवेत स्वमालकीच्या घरात वास्तव्यास होता. दरम्यान, नालासोपारा येथे वास्तव्यास असणाऱ्या त्याच्या काकांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते. त्यांच्या दिवसकार्याला जाण्यासाठी तेजस हा पत्नीसमवेत गुरुवारी सकाळी ठाणे रेल्वे स्टेशनवर पोहोचला. पत्नीला लोकलमध्ये महिलांच्या राखीव डब्यात सुरक्षितरित्या बसवून तो अन्य डब्यात बसण्यासाठी गेला. स्टेशनवरून लोकल मार्गस्थ होत असतानाच डब्यात अचानक गर्दी वाढली. या गर्दीचा धक्का बसून तो लोकलच्या डब्यातून बाहेर फेकला गेला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.दरम्यान, तेजसच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, वहिणी असा परिवार आहे. तेजस हा मनमिळावू स्वभावाचा होता. त्याचा मित्र परिवारही मोठा होता. देवगड तालुका नाभिक संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार उदय पवार यांचा तो पुत्र होता. या घटनेने देवगड परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. ठाणे परिसरात रेल्वे स्थानकांवर सुटणाऱ्या गाड्यांमध्ये वाढणारी गर्दी यावर सुरक्षा दलांनी काही विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे.

15
1100 views

Comment