मिरवणुकातील प्लास्टिक कन्फेटीवर बंदी घालावी — शैलेश भाऊ सावजी यांची मागणी
“कन्फेटीमुळे स्वच्छतेचा बोजवारा; प्रशासनाला कारवाईची मागणी”
डोणगाव प्रतिनिधी सालार बेग
ता मेहकर: गावांमधील सण-उत्सव व धार्मिक मिरवणुकांदरम्यान उडवण्यात येणाऱ्या बारीक प्लास्टिक कागद (कन्फेटी) कचऱ्यावर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी बुलढाणा जिल्हा भा.रा. काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष शैलेश भाऊ सावजी यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांना दिलेल्या निवेदनात सावजी यांनी नमूद केले आहे की, मिरवणुकांमध्ये उडवण्यात येणारा प्लास्टिक कागद सुरुवातीला आकर्षक वाटतो; मात्र मिरवणूक संपल्यानंतर तो रस्ते, नाले व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात साचतो. यामुळे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होऊन नाल्यांमध्ये अडथळे तयार होतात व पाणी निचरा व्यवस्थेवर परिणाम होतो.
तसेच, गावांमधील मोकाट जनावरे हा कचरा अन्न समजून खात असल्याने त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. प्लास्टिक कचरा सहज विघटन होत नसल्यामुळे पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
या पार्श्वभूमीवर मिरवणुकांमध्ये प्लास्टिक कचऱ्याचा वापर बंद करावा, पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्याबाबत जनजागृती करावी, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सावजी यांनी केली आहे.