logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जी. एम. वेदक कॉलेज ऑफ सायन्स तळा येते पदवी प्रदान सोहळा उत्साहात

श्री गोपीनाथ महादेव वेदक प्रतिष्ठानचे जी.एम.वेदक कॉलेज ऑफ सायन्स तळा वार्षिक पदवी प्रदान सोहळा शनिवार, १८ एप्रिल रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण, दिमाखदार व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पा साजरा करण्यासाठी आयोजित या सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य व डी. जी. तटकरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नानासाहेब यादव यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “पदवी ही केवळ कागदाचे प्रमाणपत्र नसून त्यामागे विद्यार्थ्यांची लहानपणापासूनची मेहनत, चिकाटी आणि जिद्द दडलेली असते. या यशामध्ये पालकांचे त्याग, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत महत्त्वाची भूमिका बजावते. भविष्यात उच्च पदांवर कार्यरत असताना विद्यार्थ्यांनी आपल्या मातृसंस्थेशी असलेले नाते जपणे अत्यावश्यक आहे.” त्यांच्या विचारांना उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट मिळाला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले धाटाव येथील डीआरटी-अँथिया अरोमा केमिकल्स प्रा. लि. चे महाव्यवस्थापक (ऑपरेशन्स) श्री. अमोल बागडे यांनी ‘आंतरविद्याशाखीय अभ्यास’ (Interdisciplinary Approach) या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानाधारित युगात एकाच विषयात प्रभुत्व मिळविण्याबरोबरच इतर विषयांशी असलेले परस्परसंबंध समजून घेणे आवश्यक आहे. “ज्ञानाच्या विविध शाखांमधील परस्पर संबंध ओळखल्यास विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन अधिक व्यापक आणि प्रभावी होतो,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना बहुआयामी विचारसरणी विकसित करण्याचे आवाहन केले. तसेच, दुसरे अतिथी म्हणून लाभलेले धाटाव येथील एक्सेल इंडस्ट्रीजच्या संशोधन व विकास (R&D) विभागाचे मुख्य व्यवस्थापक डॉ. धनाजी मोहिते यांनी रसायनशास्त्र विषयातील करिअरच्या विस्तीर्ण संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी केमिकल उद्योगातील प्रत्यक्ष कामकाज, संशोधन क्षेत्रातील संधी आणि उद्योग-शिक्षण समन्वय याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत योग्य करिअर निवडीसाठी प्रेरित केले.
या सोहळ्यात महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष बीएससी (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी), इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तसेच कॉम्प्युटर सायन्स विभागातील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. पदवी स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान, अभिमान आणि उत्साह स्पष्टपणे दिसून येत होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रभारी प्राचार्य डॉ. सचिन बंगाळे यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि विविध शैक्षणिक, संशोधनात्मक तसेच सहशैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर परीक्षा विभागाचा वार्षिक अहवाल प्रा. जयदीप देवरे यांनी सादर केला.
संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ. नंदकुमार वेदक, सेक्रेटरी माननीय श्री. उन्मेश वेदक तसेच स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य मा. पुरुषोत्तम मुळे असे कार्यक्रम घेण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन करतात आणि शुभेच्छा देतात.
कार्यक्रमाचे सुबक व प्रभावी सूत्रसंचालन डॉ. बुधरत्न भवरे आणि डॉ. नसरीन शेख यांनी केले, तर पदवीचे औपचारिक वाचन विभाग प्रमुख डॉ. शायना मिर्झा, डॉ. विजय रायकर, प्रा. वाढवळ आणि प्रा. जयदीप देवरे यांनी केले. या सोहळ्यास कार्यालय अधीक्षक श्री. प्रणव मेकडे, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच पदवीधर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीताने झाली, तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. शेवटी परीक्षा विभागाचे प्रमुख प्रा. जयदीप देवरे यांनी मान्यवर, उपस्थित शिक्षकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे आभार मानले.
महाविद्यालयीन प्रशासनाच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे, शिक्षकवर्गाच्या सहकार्यामुळे आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा पदवी प्रदान सोहळा अत्यंत यशस्वी आणि उत्साहात पार पडला.

12
8332 views

Comment