समांतर रंगभूमी कलावंत संघटनेची अधिकृत नोंदणी कलावंतांच्या न्याय हक्कांसाठी नवे व्यासपीठ
समांतर, प्रायोगिक आणि हौशी रंगभूमीवर कार्य करणाऱ्या कलावंतांसाठी “समांतर रंगभूमी कलावंत संघटना” आता अधिकृतरित्या नोंदणीकृत झाली आहे.
शासनाच्या विविध स्पर्धा, अनुदान योजना, सांस्कृतिक महोत्सव आणि निवड प्रक्रियेतून अनेकदा कलावंतांवर होणारा अन्याय, पारदर्शकतेचा अभाव, तसेच निर्णय प्रक्रियेत असलेली अस्पष्टता याविरोधात संघटित आणि कायदेशीर पातळीवर आवाज उठवण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.
यापूर्वी विविध परिषद व संस्था अस्तित्वात असल्या तरी त्या धर्मदाय अंतर्गत नोंदणीकृत असल्यामुळे त्यांच्या कार्यावर काही कायदेशीर मर्यादा येत होत्या. त्यामुळे कलावंतांच्या न्याय हक्कांसाठी ठोस आणि प्रभावी लढा उभा करण्यास अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील हौशी नाट्यकलावंतांची स्वतंत्र, सक्षम आणि कायदेशीरदृष्ट्या भक्कम संघटना उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
या समांतर रंगभूमी कलावंत संघटनेच्या माध्यमातून कलावंतांचे संघटन, शासनाच्या योजनांमध्ये पारदर्शकता, स्पर्धा व महोत्सवांतील न्याय्य प्रक्रिया, तसेच कलावंतांच्या हक्कांचे संरक्षण यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येणार आहेत.
संघटनेची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे :
अध्यक्ष – डॉ.श्याम शिंदे (अहिल्यानगर)
सचिव – दिनेश कवडे (नांदेड)
उपाध्यक्ष, प्रशासकीय – संजय भाकरे (नागपूर)
उपाध्यक्ष, उपक्रम – अरुण कदम (मुंबई)
सह सचिव – सागर लोधी (पुणे)
कोषाध्यक्ष – विक्रम गवांदे (नाशिक)
सल्लागार – अशोक हंडोरे (कल्याण)
संघटक – विजय चव्हाण (सिंधुदुर्ग)
संघटक – डॉ.मीरा शेंडगे (सोलापूर)
सदस्य – किरण लोंढे (सोलापूर)
सदस्य – डॉ.गणेश शिंदे ( धाराशिव )
संघटनेत राज्यातील विविध भागांतील पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्यामुळे ही संघटना राज्यस्तरावर कार्यरत राहणार असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले. संघटनेच्या स्थापनेमुळे समांतर, प्रायोगिक आणि हौशी रंगभूमीवरील कलावंतांना एक सक्षम, एकजुटीचे आणि कायदेशीर व्यासपीठ मिळाल्याची भावना महाराष्ट्रातील नाटय कलाकारांनी व्यक्त केली आहे.
उपरोक्त संघटनेत महाराष्ट्रातील समांतर रंगभूमीवर सक्रीय असणार्या २२० पेक्षा अधिक संस्थांना अधिकृतरित्या संलग्न करण्यात येत आहे.
संघटना लवकरच राज्यातील नाटयकलावंतांना सदस्यत्वासाठी आवाहन करून जिल्हा पातळीवरील प्रतिनिधींची नियुक्ती करणार आहे.