पाथर्डीत खळबळ: विवाहाच्या उंबरठ्यावर असलेल्या तरुणीची विविक्ताच्या जाचाला कंटाळून आत्महत्या; तरुणावर गुन्हा दाखल
पाथर्डी (प्रतिनिधी):विवाह ठरलेल्या तरुणीला 'तुझे लग्न इतरत्र होऊ देणार नाही' अशी उघड धमकी देत तिचा मानसिक छळ करणाऱ्या एका विकृत तरुणाच्या त्रासाला कंटाळून, पाथर्डी तालुक्यातील एका २१ वर्षीय तरुणीने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. या धक्कादायक घटनेप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी ढवळेवाडी येथील संशयित आरोपी यज्ञेश विजय वाळके याच्याविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे लग्न जमलेले असताना आरोपी यज्ञेश वाळके याने तिला सातत्याने फोन करून लग्नासाठी तगादा लावला होता. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही,तर त्याने तरुणीच्या आई- वडिलांना आणि तिचे लग्न जमवणाऱ्या मध्यस्थांनाही फोन करून 'हिच्यावर माझे प्रेम आहे, तुम्ही हिचे लग्न जमवू नका' असे म्हणून धमकावले होते. यामुळे संबंधित तरुणी आणि तिचे कुटुंबीय प्रचंड मानसिक दडपणाखाली होते.
दिनांक १६ एप्रिल रोजी सकाळी आरोपीने पुन्हा फोन करून पीडितेच्या आईला त्रास दिला. त्यानंतर सायंकाळी नातेवाईकांच्या मोबाईलवर संपर्क साधून त्याने पीडितेशी बोलण्याची विनंती केली. या संवादानंतर मानसिक धक्क् यात असलेल्या तरुणीने सायंकाळी पाऊणेपाच
वाजेच्या सुमारास राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. तिला तातडीने शेवगाव येथील नित्यसेवा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र मृत्यूशी झुंज देत असताना आज १७ एप्रिल रोजी पहाटे च्या सुमारास उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी अंत झाला. सततचा पाठलाग, फोनवरून दिलेली धमकी आणि ठरलेले लग्न मोडण्याच्या त्रासामुळेच मुलीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तिच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेमुळे पाथर्डी तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, एका उमलत्या आयुष्याचा बळी घेणाऱ्या या नराधमावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता ग्रामस्थांमधून होत आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत