डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून रायगड पोलिसांना ६१५ बॅरिकेड्स आणि १६ ब्रेथ ॲनालायझर सुपूर्द
समाजसेवेच्या कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या रेवदंडा येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रायगड पोलीस दलाला ६१५ बॅरिकेड्स आणि १६ ब्रेथ ॲनालायझर मशीनचे वाटप करण्यात आले आहे. या मदतीमुळे जिल्ह्यातीतील वाहतूक नियंत्रण आणि गुन्हेगारी प्रतिबंधक मोहिमेला मोठे बळ मिळणार आहे.
धर्माधिकारी परिवाराच्या हस्ते साहित्याचे हस्तांतरण
एका विशेष कार्यक्रमादरम्यान डॉ. सचिन दादा धर्माधिकारी, श्री. उमेश दादा धर्माधिकारी आणि श्री. राहुल दादा धर्माधिकारी यांच्या शुभहस्ते हे साहित्य रायगडच्या जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
सामाजिक बांधिलकीचे दर्शन
वाढती वाहतूक कोंडी आणि रस्ते सुरक्षा लक्षात घेता, पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रतिष्ठानने हे पाऊल उचलले आहे. ६१५ बॅरिकेड्समुळे गर्दीचे नियोजन करणे पोलिसांना सोपे जाईल, तर १६ आधुनिक ब्रेथ ॲनालायझर मशीनमुळे मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर जरब बसवण्यास मदत होणार आहे.
यावेळी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिष्ठानचे स्वयंसेवक उपस्थित होते. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या या कार्याचे प्रशासकीय स्तरावर आणि सर्वसामान्य जनतेकडून मोठे कौतुक होत आहे.