आरटीओ ची धडाकेबाज कारवाई कल्याण मुरबाड महामार्गावरील अवैध वाहतुकीला ब्रेक एसटी गाड्या हाउसफुल
शहापूर/ साजिद शेख
रायते येथील अपघातात ११ जणांचा मृत्यू झाल्यानंतर कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने मागील तीन दिवस कल्याण ते मुरबाड रस्त्यावर धावणाऱ्या बेकायदा २२ हून अधिक जीप, ओमनी वाहन चालकांविरूध्द दंडात्मक कारवाई केली. या सलगच्या कारवाईमुळे या रस्त्यावरील अवैध वाहतूक पूर्ण बंद झाल्याने प्रवाशांचा ओढा राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी. बसकडे लागला आहे. या कारवाईतून तीन दिवसात १ लाख ७९ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मुरबाड, कल्याण एस. टी. आगारात या दोन्ही दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी होत आहे. कल्याण ते मुरबाड रस्त्यावर यापूर्वी जीप, ओमनी वाहनाने प्रवास करणारे प्रवासी ही वाहने पूर्ण बंद झाल्याने आता थांब्यावर एस. टी.ची वाट पाहत आहेत. या सलगच्या कारवाईने कल्याण, मुरबाड आगारांचा प्रवासी तिकीट विक्रीतून मिळणारा महसूल वाढला आहे.
रायते येथील पुलावर प्रवाशांची गच्च भरलेली ओमनी आणि मिक्सर यांची सोमवारी सकाळी धडक होऊन ओमनी वाहनातील ११ प्रवासी जागीच ठार झाले होते. कल्याण मुरबाड रस्त्यावर आणि मुरबाड परिसरात दरोज १०० हून बेकायदा जीप, ओमनी वाहने मनमानीप्रमाणे प्रवाशांना वाहनातून भरून प्रवास करतात. त्यामुळे या अपघातात सर्वाधिक प्रवासी मरण पावले.हा सर्व धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभाग कल्याण विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी मोटार वाहन निरीक्षकांना सोबत घेऊन गेल्या तीन दिवसांपासून कल्याण ते मुरबाड रस्त्यावर धावणाऱ्या, मुरबाड ते सरळगाव, किन्हवली, शहापूर, गावातील रस्त्यांवर धावणाऱ्या बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीप, ओमनी वाहनांवर दंडात्मक कारवाई सुूरू केली आहे. मोटार वाहन कायद्याने केलेल्या या कारवाईत दोन हजार रूपयांपासून पुढचा दंड वाहन चालकांना केला जात आहे. तीन दिवसात १ लाख ७९ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.
एस. टी. महसूल वाढला
सकाळी १० ते रात्री उशिरापर्यंत आरटीओ अधिकारी या रस्त्यावर दररोज बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांवर कारवाई करत असल्याने कल्याण ते मुरबाड, मुरबाड ते सरळगाव आणि अंतर्गत गाव, आदिवासी पाड्यांवर जाणारी बेकायदा प्रवासी वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची पावले एस. टी. दिशेने वळली आहेत. भाजीपाला, दूध विक्रेते, प्रवासी एस. टी.ची वाट पाहत थव्याने बस थांब्यावर उभे राहत असल्याचे चित्र सकाळपासून मुरबाड ते कल्याण रस्त्यावर दिसत आहे. या कारवाईमुळे एस. टी. बस प्रवाशांनी गच्च भरून जात आहे.
वाहनांची आसने काढली
जीप, ओमनी या बेकायदा वाहनांमध्ये अधिक प्रवासी बसविण्यासाठी वाहन मालकांनी वाढीव आसने बसवली होती. ही सर्व आसने आरटीओ अधिकाऱ्यांनी तपासणीच्या वेळी काढून टाकली आहेत. आपल्या वाहनांवर कारवाई होत असल्याने या बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या मालकांनी स्थानिक काही राजकीय मंडळींचे उंबरे झिजवण्यास सुरूवात केली आहे. हे लोकप्रतिनिधी त्यांना दारात सध्या उभे राहून देत नसल्याचे समजते.
कल्याण ते मुरबाड रस्त्यावर अवैधपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आरटीओ विभागाकडून सलग तीन कारवाई सुरू आहे. ही कारवाई मुरबाड, शहापूर भागात नियमित केली जाणार आहे. सतत कारवाई करूनही जी वाहने अवैध प्रवासी वाहतूक करताना आढळली तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई बरोबर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. या कारवाईने एस. टी. बसकडे प्रवाशांचा ओढा वाढला आहे. – आशुतोष बारकुल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.