logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नाशिकच्या राजकारणात एकाच दिवशी तीन बड्या राजकीय नेत्यांवर गुन्हे दाखल.

नाशिकचे राजकीय वातावरण गुन्ह्यांच्या थराराने हादरून गेले आहे. शहराच्या राजकारणातील तीन वेगवेगळ्या बड्या नेत्यांवर एकाच दिवशी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. या मध्ये माजी महापौरांसह, विद्यमान गटनेते आणि माजी नगरसेवकाचा समावेश आहे.
माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्यावर गुन्हा दाखल
नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे सेनेचे कार्यकर्ते योगेश दाभाडे यांनी मुर्तडक यांच्याकडून पैसे उसने घेतले होते. दाभाडे यांच्या म्हणण्यानुसार, व्याजासह पैसे परत करूनही मुर्तडक यांनी त्यांच्या घरात घुसून कुटुंबीयांना अश्लील शिवीगाळ केली आणि त्यांना बेदम मारहाण केली. "तू मेलास तरी तुझ्या स्मशानातून पैसे काढेल," अशी धमकी मुर्तडक यांनी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या मानसिक त्रासाला कंटाळून योगेश दाभाडे यांनी फिनाईल पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी मुर्तडक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, मुर्तडक हे मनसेच्या सत्ताकाळात महापौर होते, मात्र सध्या ते कोणत्याही पक्षात सक्रिय नाहीत.
केशव पोरजेही कायद्याच्या कचाट्यात
दुसऱ्या घटनेत, शिवसेना ठाकरे गटाचे महापालिका गटनेते केशव पोरजे कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. एका माजी सैनिकाची 9 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप पोरजे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका लोकप्रतिनिधीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे
शिवाजी चुंभळे यांच्यावरही गुन्हा दाखल
तिसऱ्या घटनेत, माजी नगरसेवक शिवाजी चुंभळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शेतजमिनीच्या कारणावरून झालेल्या वादातून चुंभळे यांनी संबंधित व्यक्तीवर हल्ला केल्याचा आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये पंचवटी, उपनगर आणि इतर बड्या नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक पोलीस आता या तिन्ही प्रकरणांचा सखोल तपास करत आहेत.

32
1544 views

Comment