शेवगाव पोलिसांची मोठी कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीसह साथीदार गजाआड
शेवगाव (प्रतिनिधी):
सालबडगाव येथील संदीप दिनकर लांडे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी फरार असलेल्या दोन आरोपींना जेरबंद करण्यात शेवगाव पोलिसांना यश आले आहे. रामा चंद्रकांत गाडे आणि त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी पहाटेच्या सुमारास थरारक पाठलाग करून ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल २०२६ रोजी संदीप लांडे (वय ३२) हे शेतात काम करत असताना आरोपींनी त्यांना कामाच्या बहाण्याने शेवगाव येथील ढाकणे वस्ती परिसरात नेले. तिथे झालेल्या वादातून आरोपींनी लाकडी काठी, पट्टा आणि दगडाने मारहाण करून संदीप यांची हत्या केली होती. याप्रकरणी दिनकर लांडे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा (रजि. नं. २६८/२०२६) दाखल करण्यात आला होता.
घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी आरोपींच्या शोधासाठी तीन वेगवेगळी पथके तयार केली होती. १६ एप्रिल रोजी पहाटेच्या वेळी आरोपी आखेगाव रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचला असता, आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने शिताफीने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पो.नि. संतोष मुटकुळे, पोसई बाजीराव सानप, पोहेकॉ चंद्रकांत कुसारे, शाम गुंजाळ, भगवान सानप आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
पुढील तपास पोसई बाजीराव सानप हे करत आहेत.