ऊसतोड कामगाराचा मुलगा ते डॉक्टर; शुभम जाधव यांची प्रेरणादायी झेप
ऊसतोड कामगाराचा मुलगा ते डॉक्टर; शुभम जाधव यांची प्रेरणादायी झेप
अमळनेर प्रतिनिधी
जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या बळावर कोणतेही स्वप्न साकार होऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे वसंत नगर तांडा (ता. पारोळा) येथील डॉ. शुभम सीताबाई निंबा जाधव. ऊसतोड कामगार कुटुंबातील या होतकरू विद्यार्थ्याने MBBS परीक्षेत अभूतपूर्व यश संपादन करत गावाचे नाव उज्ज्वल केले असून, तो आज संपूर्ण परिसरासाठी प्रेरणास्थान ठरला आहे.
साने गुरुजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी असलेल्या शुभमच्या या यशानिमित्त जाधव परिवार व ग्रामस्थांच्या वतीने त्याचा भव्य स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. या प्रसंगी निवृत्त मुख्याध्यापक एस. डी. देशमुख,
विज्ञान मंडळाचे अध्यक्ष डी. के. पाटील सर, धुळे जिल्ह्यातील चितोड आश्रम शाळेचे मुख्याध्यापक आखाडे सर, तसेच मोठा भाऊ डॉ. मिलन जाधव, गुरुजन, नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारंभात बोलताना देशमुख सर व आखाडे सर यांनी शुभमने विद्यार्थी दशेत केलेल्या प्रामाणिक मेहनतीचे आणि चिकाटीचे कौतुक करत, हे यश त्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित असल्याचे सांगितले. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची ज्योत न विझवता पुढे जाण्याचा त्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. शुभम जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या आई-वडिलांच्या कष्टमय जीवनाचा विशेष उल्लेख केला. “त्यांच्या संघर्षामुळेच मला शिक्षणाची प्रेरणा मिळाली,” असे सांगत त्यांनी आपल्या मार्गदर्शक गुरुजनांचे, मोठा भाऊ डॉ. मिलन जाधव, मामा रमेश चव्हाण आणि मित्रपरिवाराचे मनःपूर्वक आभार मानले.
वसंत नगर तांड्यासारख्या ग्रामीण भागातून डॉक्टर होण्यापर्यंतचा शुभमचा प्रवास अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, “मेहनत आणि जिद्द असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नाही,” हा संदेश त्याने आपल्या यशातून दिला आहे.