सरकारी शाळेमध्ये ध्वजारोहण कोणी करावे? महाराष्ट्र राज्य शासनाचे स्पष्ट आदेश.
कोल्हापूर : १६ ( प्रतिनिधी ) राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये राष्ट्रीय सणानिमित्त होणाऱ्या ध्वजारोहणाबाबत शासनाने आता पूर्णपणे चित्र स्पष्ट केले आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये ध्वजारोहणाचा मान हा शाळेच्या मुख्याध्यापकांचाच असेल असे आदेश ग्रामविकास व जलसंधारण विभागाने दिले आहेत.
पाहुण्यांच्या निवडीबाबतचा संभ्रम मिटला. अनेकदा शाळांमध्ये ध्वजारोहणासाठी स्थानिक नेते किंवा प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रित केले जाते. ज्यामुळे ध्वज नक्की कोणी फडकवावा याबाबत संभ्रम निर्माण होत असे.
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील शेतकरी संघर्ष कृती समितीने माहिती अधिकारांतर्गत यावर स्पष्टीकरण मागवले होते. त्यावर उत्तर देताना शासनाने केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने निश्चित केलेल्या नियमावलीचा दाखला दिला आहे. कोठे कोणाच्या हस्ते ध्वजारोहण?
शासकीय आदेशानुसार प्रोटोकॉल खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आला आहे. राज्य स्तर मुंबई माननीय राज्यपाल आणि मुख्यमंत्री. जिल्हा स्तर जिल्ह्याचे पालकमंत्री. तालुका स्तर तहसीलदार किंवा प्रांत अधिकारी. शाळा स्तर संबंधित शाळेचे मुख्याध्यापक. मुख्याध्यापकांचा सन्मान कायम. शासनाने आपल्या परिपत्रकात स्पष्ट म्हटले आहे की, केंद्र शासनाच्या सूचनेनुसार मुंबईत राज्यपाल व मुख्यमंत्री, जिल्हा स्तरावर पालकमंत्री, तालुका स्तरावर तहसीलदार व शाळांमधून शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहण व्हावे. या आदेशामुळे आता शाळांमध्ये मुख्याध्यापकांच्या हस्तेच ध्वज फडकवला जाणार असून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व विभागीय आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत