२५ हजाराची लाच घेताना वनपाल आणि वनरक्षक एसीबीच्या ताब्यात
ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई
शहापूर /साजिद शेख
ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वन विभागातील दोन लोकसेवकांना २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना घेताना बुधवारी रंगेहात पकडले. नवीन पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला ना हरकत दाखला देण्याच्या बदल्यात ही लाच घेतल्याची बाब कारवाईतून पुढे आली आहे.
वनपाल विलास शिवाजी सानप (वय ५१ ) आणि वनरक्षक रेखा विनायक गायकवाड (वय ३८) या दोघांवर लाच प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी कल्याण-मुरबाड रोड, मामनोली (ता. कल्याण) येथील वनपरिमंडळ अधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत. तक्रारदाराला नवीन पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी वन विभागाचा ना हरकत दाखला हवा होता. या कामाचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यासाठी वनपाल विलास सानप यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम २५ हजार रुपये ठरवण्यात आली.
तक्रारदाराने याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या मागणीची पथकाने पडताळणी केली, त्यात लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, १५ एप्रिल २०२६ रोजी सापळा रचण्यात आला. त्यावेळी विलास सानप यांच्या सांगण्यावरून रेखा गायकवाड यांनी २५ हजार रुपये स्वीकारताच त्यांना पथकाने ताब्यात घेतले. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाणे येथे नोंद करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे आणि सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात सर्व वनापरिक्षेत्र अधिकारांच्या क्षेत्रात ना हरकत दाखला घेण्यासाठी मोठ्या प्रकारच्या रकमेची लाच मागण्यात येते अशा प्रकारची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी वरिष्ठांकडे केली आहे परंतु वरिष्ठांनीही दुर्लक्ष केल्याने ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शहापूर तालुक्यातही अशी कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी व नागरिकांनी केली आहे