logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

वृत्तपत्रांच्या शासकीय जाहिरात दरवाढीची मागणी; व्हॉईस ऑफ मीडियाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत
समीर नवाज भंडारा.
भंडारा :- राज्यातील वृत्तपत्र उद्योगाला आर्थिक संकटातून दिलासा देण्यासाठी जाहिरात दरात १५० टक्के वाढ करण्यासह विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवासी उपजिल्हाधिकारी भंडारा यांच्या मार्फत हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, वृत्तपत्र उद्योग हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून शासनाच्या योजना व निर्णय जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य करतो. मात्र २०१९ पासून कागद, प्रिंटिंग साहित्य, केमिकल्स, वीज व मनुष्यबळ यांसारख्या खर्चात सुमारे १५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली असतानाही शासनाकडून मिळणाऱ्या जाहिरात दरात कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे लघु व मध्यम वृत्तपत्रांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यभरात तीन दिवसांपासून लाक्षणिक आंदोलन सुरू असून, शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मुख्य मागण्यांमध्ये जाहिरात दरात १५० टक्के वाढ, ई-टेंडर जाहिराती पूर्ण स्वरूपात प्रसिद्ध करणे, किमान २०० चौ. से. जाहिरात आकार निश्चित करणे, तसेच जाहिरातींचे देयक ३० दिवसांत अदा करण्याची अट लागू करणे यांचा समावेश आहे. याशिवाय, पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देणे, शंकरराव चव्हाण पत्रकारिता पेन्शन योजनेच्या अटी शिथिल करणे, लघु व मध्यम वृत्तपत्रांना समान संधी देणे, जाहिरात वाटपात पारदर्शकता ठेवणे, तसेच सर्व शासकीय जाहिराती शासनाच्या माहिती विभागामार्फतच देण्याची व्यवस्था करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
व्हॉईस ऑफ मीडिया भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष शशिकांत भोयर यांनी सांगितले की, वृत्तपत्र उद्योग हा केवळ व्यवसाय नसून लोकशाहीचा पाया आहे. आर्थिक अडचणींमुळे हा उद्योग कमकुवत झाल्यास जनतेच्या माहितीच्या अधिकारावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण यांच्या मार्फत व्हॉइस ऑफ मीडियाचे पदाधिकारी यांनी दिले आहे. निवेदन देतेवेळी जिल्हा अध्यक्ष शशिकांत भोयर, विशाल रणदिवे, हंसराज रामटेके, राकेश श्यामकुवर, विलास सुदामे, समीर नवाज, विलास केजरकर, हंसराज भोतमांगे, मुकेश कुमार मेश्राम, उमेश जांगडे यांच्यासह दैनिक वृत्तपत्र प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक मीडिया तथा यूट्यूब सोशल मीडियाचे प्रतिनिधी, पत्रकार उपस्थित होते.

14
947 views
1 shares

Comment