‘निर्भया’ प्रकरणात २४ तासांतच दोषारोपपत्र! हडपसर पोलिसांची कारवाई
पुणे : अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात हडपसर पोलिसांनी अभूतपूर्व वेग दाखवत अवघ्या २४ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून आरोपीला कायद्याच्या कचाट्यात आणले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती आली.
युनुस गफार खान (वय ५५, रा. कोंढवा रोड) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ०६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ११ वर्षीय मुलगी शाळेतून रिक्षाने घरी परतत होती. यावेळी रिक्षाचालकाने तिच्या अल्पवयाचा व एकटेपणाचा गैरफायदा घेत, रिक्षामध्येच तिच्याशी अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी युनुस खान याच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा नोंद होताच आरोपी फरार झाला होता. मात्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तत्काळ दोन विशेष पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलीस अंमलदार कानेकर यांना आरोपी हडपसर परिसरातील निर्जन ठिकाणी रिक्षासह दबा धरून बसलेला आढळून आला. पोलिसांनी कौशल्याने सापळा रचत त्याला ताब्यात घेतले.
यानंतर सहायक पोलीस निरीक्षक विनोद साने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास वेगाने पूर्ण करण्यात आला. पोलीस अंमलदार दत्तात्रय खेडेकर व कानेकर यांनी आवश्यक पुरावे गोळा करून आरोपीविरुद्ध भक्कम पुराव्यांची मांडणी केली. परिणामी, अवघ्या २४ तासांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
या संपूर्ण कारवाईत पोलीस उपआयुक्त (परिमंडळ ६) डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले व पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी बजावली.