वाहतूक पर्यायी अभावी मरण धोका
शहापूर /साजिद शेख
मुंबईहून लागून असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला खेटून गेल्या काही वर्षापासून सुरू असलेली महामार्गांची कामे, अवजड वाहतुकीच्या भारामुळे कोंडलेले रस्ते आणि अर्धनागरीकरणाच्या फेर्यात अपुरी पडू लागलेली राज्य परिवहन महामंडळाची सेवा यामुळे या पट्ट्यात बेकायदा, धोकादायक प्रवासाचे पेव फुटले आहे.
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही वर्षात एसटीच्या फेर्या ३० टक्क्यांनी कमी झाल्याच्या तक्रारी येथील आमदार तसेच ग्रामस्थ मंडळे करत आहेत. कल्याण-अहिल्यानगर, जेएनपीए-वडोदरा, मुंबई-नागपूर समृद्धी अशा मोठ्या महामार्गांच्या कामांमुळे वाहन कोंडी, बदललेले वाहतूक मार्ग, प्रवासाचा वाढलेला वेळ यामुळे ग्रामीण भागातील एस.टी वाहतूक सेवा विस्कळीत झाल्याची तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर विकासाच्या या फेर्यात दैनंदिन प्रवासासाठी एस. टी. ला पर्याय म्हणून सहा आसनी रिक्षा, लहान टेम्पोची चलती आहे.
राज्य परिवहन महामंडळाने काही दशकांपूर्वी ‘गाव तेथे एसटी’ सेवा सुरू करून प्रवाशांना दिलासा दिला. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत प्रवासासाठी हा उत्तम पर्याय ग्रामीण भागात आहे. मात्र ठाणे जिल्ह्यात होणार्या शहरीकरणाच्या रेट्यात वाढत असलेली लोकसंख्या आणि विकासाच्या नावाखाली गावांच्या वेशीपर्यत पोहचलेले मोठे महामार्ग, मोठी नागरी संकुले यामुळे एसटीची वाहतूक अपुरी पडत आहे.संगणकीकरण आणि व्यवस्थेतील शिस्तीच्या अभावाने एसटीच्या चोरट्या तिकीट विक्रीचे (कट बुकिंग) वारेही वाहू लागल्याच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यातील वांगणी, बदलापूर, मुरबाड, भिवंडी, शहापूरसारख्या प्रमुख तालुक्यांना खेटून असलेल्या गावांमध्ये रोजच्या दळणवळणासाठी जुन्या जीप, ओमनी व्हॅन बेरोजगारांना रोजगाराचे साधन ठरत आहे. सोमवारी रायतेजवळ झालेला अपघात सार्वजनिक व्यवस्थेची दुरवस्था आणि अर्धनागरीकरणाच्या वेढ्यात सापडू लागलेल्या या गावांसाठी धोक्याचा इशारा ठरला आहे.
सध्या स्वत:च्या वाहनातून प्रवासाला पसंती आहे. मात्र विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार यांच्यासाठी लालपरीच परवडणारा पर्याय आहे. शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थ्यांची माफक दर, सुरक्षित प्रवास म्हणून एस. टी.लाच पसंती असते. मात्र बहुतांश मार्गांवर बस नाहीत किंवा फेर्या मर्यादित आहेत. गेल्या काही वर्षात बसची संख्या कमी झाली आहे. मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनीही महामार्गांच्या कामामुळे एसटीच्या फेर्या कमी झाल्याची कबुली दिली. मात्र ही परिस्थिती बदलेले आणि फेर्या वाढतील असेही ते म्हणाले. त्यामुळे प्रवाशांना खासगी काळ्या पिवळ्या रंगांच्या वाहनांवर अवलंबून राहावे लागते.कसारा ते नाशिक खासगी वाहतूक होते. शहापूर, मुरबाड, बदलापूर, कल्याण, भिवंडी परिसरात अशा वाहनांचा वापर होतो. हे सर्व मार्ग ‘परिवहन’ला मोठा महसूल देणारे आहेत. आता बेकायदा प्रवासी वाहनातून प्रवाशांना प्रवास करावा लागतो.
मागणीनुसार विविध मार्गांवर बसगाड्यांची वाहतूक सुरू करण्यात आली. परंतु काही वेळेस बसगाड्यांसाठी पुरेसे प्रवासी मिळत नाहीत. पाच ते दहा प्रवासी तर कधी प्रवासीच नसतात. यामुळे परिवहनचे नुकसान होत असल्याने हे मार्ग बंद करण्यात येतात. परंतु, नागरिकांचा प्रतिसाद असेल तर, त्या मार्गांवर निश्चितच बस वाहतूक सुरू करण्यात येईल. – प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
आता लवकरच बसच्या फेर्या वाढतील. त्याचे नियोजन झाले आहे. याचा फायदा बदलापूर, मुरबाड, शहापूर आणि कल्याणच्या प्रवाशांना होईल. मुरबाड आगारात १० नव्या बस दाखल झाल्या आहेत. २५ इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. – किसन कथोरे, आमदार, मुरबाड