रायते नंतर मुंबई नाशिक महामार्गावर मोठा अपघात ठाणे येथील एकाचा मृत्यू तर डोंबिवलीतील चार जण जखमी
शहापूर /साजिद शेख
रायते येथील अपघातात सोमवारी ११ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मुंबई नाशिक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर चारजण जखमी झाल्याचा प्रकार मंगळवारी पहाटे उघडकीस आला. हे पाचही तरुण २० ते २६ वयोगटातील आहेत. कार आणि अवजड वाहनामध्ये हा अपघात झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
या अपघातात ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील अंबिकानगर परिसरात राहणाऱ्या दीपक पटेकर (२६) याचा मृत्यू झाला आहे. तर डोंबिवली पूर्व येथे राहणाऱ्या सुजय पाटील (२०), राज चिले (२१), सुगम जयस्वाल (२४) आणि स्नेहल भुसेकर (२३) हे जखमी झाले आहेत. यातील सुजय, राज आणि सुगम हे गंभीर जखमी आहेत.
मुंबई नाशिक महामार्गावरून मंगळवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास हे पाचही जण एका कारमधून नाशिकच्या दिशेने वाहतुक करत होते. त्यांची कार खारेगाव टोलनाका परिसरातील पेट्रोल पंप येथे आली असता, दीपक यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार त्यांच्या पुढे असलेल्या कंटेनर या वाहनाला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की कारच्या पुढील भागाचा अक्षरश: चुराडा झाला. घटनेची माहिती वाहतुक विभागाला मिळाल्यानंतर वाहतुक विभागाचे कर्मचारी, कळवा पोलीस ठाण्याचे कर्मचारी, ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दीपक हा वाहनामध्ये अडकला होता. पथकाने त्याला कारमधून बाहेर काढले. तसेच उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. परंतु डाॅक्टरांनी त्याला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारापूर्वीच मृत घोषित केले.सुजय याच्या शरिराला आणि डोक्याला दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले होते. परंतु त्याच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी नवी मुंबई येथील घणसोली भागातील खासगी रुग्णालयात नेले. तर राज आणि सुगम यांच्या डोक्याला आणि शरिराला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर स्नेहल हिला किरकोळ दुखापत झाल्याने तिच्यावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातानंतर ठाणे जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरुच असल्याचे चित्र दिसत आहे.