कास पठार – बामनोली रस्त्याची दुरवस्था; पर्यटक व ग्रामस्थ त्रस्त
कास पठार ते बामनोली या दरम्यानचा महत्त्वाचा रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून स्थान
कास पठार – बामनोली रस्त्याची दुरवस्था; पर्यटक व ग्रामस्थ त्रस्त
कास पठार ते बामनोली या दरम्यानचा महत्त्वाचा रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून स्थानिक ग्रामस्थ व पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यानंतर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी डांबरीकरण पूर्णपणे नष्ट झाले आहे.
या रस्त्यावरून दररोज शेकडो पर्यटक कास पठाराच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी ये-जा करतात. मात्र रस्त्याची दयनीय अवस्था पाहता वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. दुचाकीस्वारांना घसरण्याचा धोका वाढला असून लहान-मोठे अपघातही घडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. पर्यटनस्थळाचा दर्जा असलेल्या कास पठाराकडे जाणारा हा मुख्य मार्ग असूनही दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांनी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून सुरक्षित प्रवासाची सोय करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. अन्यथा येत्या काळात आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे