ठाणे जिल्ह्यातील गाव तेथे एसटी बंद झाल्या गाव तिथे बेकायदा ओमिनी जीप ला आले उधान
शहापूर/साजिद शेख
तीस वर्षापूर्वी शासनाच्या राज्य परिवहन महामंडळाने गाव तेथे एस. टी. सुरू करून प्रवाशांना झटपट दिलासादायक प्रवासाची सोय उपलब्ध करून दिली होती. सकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत नागरिक एस. टी. ने प्रवास करत होते. एस. टी. बस प्रवाशांनी सकाळपासून ते रात्रीपर्यंत खचाखच भरून जायच्या. पण, एस. टी.मध्ये कट बुकिंगचे वारे घुसले, बेरोजगारामुळे हाताला काम नाही म्हणून जुन्यापुराण्या जीप, ओमनी गाड्या प्रवासी वाहतुकीसाठी बेकायदाशीरपणे सुरू झाल्या. भंगार मोटारीच्या साहाय्याने बिनभांडवली पैसा कमवता येतो याची जाणीव झाल्याने बेरोजगार तरूण अधिक संख्येने या अवैध वाहतुकीकडे वळले. या वाढत्या जीप ठाणे जिल्ह्यातील एस. टी. बस बंद पाडण्यात कारणीभूत ठरल्या.
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, भिवंडी एस. टी. आगार लालभडक बस आणि प्रवाशांनी पहाटेपासून खचाखच भरलेले असायचे. ग्रामीण भागातील मुंबई, ठाणे, नवी मुंबईत जाणारा बहुतांशी नोकरदार हा सकाळच्या वेळेत एस. टी. जवळच्या रेल्वे स्थानकापर्यंत यायचा. लोकल वेळेप्रमाणे संध्याकाळी, रात्री एस. टी.ने घरच्या प्रवासाला निघायचा. एस. टी. प्रवास हा सुरक्षित प्रवास म्हणून या प्रवासाला सर्वाधिक प्राधान्य देत होते. डोंगर दऱ्यातून, कितीही मुसळधार पाऊस असला तरी एस. टी. वाहतूक सुरू असायची. गावोगावी आणि डोंगर दऱ्यात विशिष्ट आवाज काढत धावणाऱ्या एस. टी. बस प्रवाशांच्या विशेष आकर्षण असायच्या. गावातून एस. टी. सुटली की लहान मुले एस. टी. सोडलेल्या धुराच्या लोटात पाठीमागे धावायची, असे मनोरंजनात्मक चित्र गावात असायचे. रात्रीच्या वेळेत एस. टी. सकाळच्या प्रवासासासाठी वस्तीला जायच्या.
गाव खेड्यातील टपाल वाहतूक एस. टी.ने होत होती. भाजीपाला, मासळीची वाहतूक एस. टी.च्या टपावरून होत होती. विविध प्रकारच्या व्यावसायिकांची एस. टी. ही जीवनवाहिनी होती.तीस ते चाळीस वर्षापूर्वी एस. टी. च्या काही वाहकांनी दूरवरून प्रवास करून आलेल्या प्रवाशाला मूळ ठिकाणचे तिकीट न देता तालुक्याचे ठिकाण जवळ आले की एक ते दोन रूपयाचे तिकीट देऊन उर्वरित पैसे खिशात घालण्याची क्लृप्ती शोधली होती. यामुळे स्थानिक काही वाहक गडगंज झाले. या काही वाहकांची ही वृत्ती इतर वाहकांमध्ये शिरली. हळुहळू या माध्यमातून एस. टी. तोट्यात जाऊ लागली. कुंपणच शेत खात होते, ते वरिष्ठांना दिसत नव्हते. हा प्रकार इतका वाढला की प्रवासी भारमान वाढले तरी एस. टी.चे उत्पन्न घटले. या सर्व व्यस्त प्रकाराने एस. टी. हळुहळू तोट्यात गेली.
एस. टी. तोट्यात चालत असल्याने एस. टी.च्या वरिष्ठांनी हळुहळू गावोगावी सुरू असलेल्या बस बंद करण्याची मोहीम हाती घेतली. गावातील एस. टी. बंद झाल्याने त्या भागात प्रवाशांच्या सोयीसाठी वापरून भंगार झालेल्या जीप, ओमनी गावोगावच्या बेरोजगार तरूणांनी प्रवासी जीपमध्ये कोंबुन प्रवासी वाहतुकीला सुरूवात केली. जीपमध्ये आठ प्रवासी, ओमनीमध्ये सहा प्रवासी वाहतुकीला मुभा असताना या जीपमध्ये आणि दरवाजा, खिडकीला लोंबकळत असे १५ हून अधिक प्रवासी भरून चालक, वाहन मालक दिवसाला रग्गड पैसा कमवू लागले.
एस. टी. साधन बंद झाल्याने जीप हेच प्रवाशांचे मुख्य साधन झाले. झटपट जलद प्रवास म्हणून प्रवासी, व्यावसायिक आता या बेकायदा वाहतुकीला सर्वाधिक पसंती देत आहेत. या बेकायदा जीप शहापूर, मुरबाड, भिवंडी ग्रामीण भागातील प्रवाशांचे प्रवाशांचे मुख्य साधन झाले आहे. कोट्यवधीचा महसूल बुडत असताना शासन या सर्व बेकायदा व्यवस्थेकडे अंधनजरेने पाहत असल्याने वाहतूक क्षेत्रातील जाणकार तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.