कळमेश्वर येथील इंदिरा गांधी महाविद्यालयात सामाजिक समता सप्ताहानिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न...!
कळमेश्वर (जि. नागपूर) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्प, ता. कळमेश्वर व समाज कल्याण विभाग, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील इंदिरा गांधी महाविद्यालयात सामाजिक समता सप्ताहानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेचा विषय “महात्मा ज्योतिबा फुले यांचे समाजविकासासाठी योगदान”, “मजूर समस्या” आणि “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार” असा होता. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन व विद्यापीठ गीताने वातावरण भारावून गेले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन प्रामाणिकपणे कार्य करावे, असे आवाहन केले.
वक्तृत्व स्पर्धेत एकूण नऊ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये कुमारी तनुश्री राजेंद्र चौधरी हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर सलोनी चेतन बागडे हिने द्वितीय क्रमांक मिळविला. विजेत्या स्पर्धकांना संविधान उद्देशिकेची प्रत व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मंजुषा निस्ताने यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. किशोर दुर्गे यांनी मानले. कळमेश्वर तालुका समतादूत कुंदा बोरकर यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच इतर महामानवांचे विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले.
या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
या उपक्रमासाठी बार्टीच्या महासंचालक दीपली मुधोळ मुंडे, विभाग प्रमुख डॉ. बबनराव जोगदंड, प्रकल्प व्यवस्थापक डॉ. सुमेध थोरात, सहायक आयुक्त नागपूर श्रीमती सुकेशिनी तेलगोटे तसेच जिल्हा प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले यांचे मार्गदर्शन लाभले.