logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मुरबाड शहापूर भिवंडी परिसरात दररोज धावतात ७०० बेकायदा जीप

गावोगावी धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी. बस बंद झाल्याने, या बसवर अवलंबून असलेले प्रवासी आता प्रवासासाठी खटारा जीपवर अवलंबून राहत आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शहापूर, मुरबाड, भिवंडी तालुका परिसरातील विविध भागात दररोज सुमारे ७०० जीप, ओमनी प्रवाशांची बेकायदा वाहतूक करत आहेत.
स्थानिक पातळीवर वाहतूक पोलिसांचे पुरेसे मनुष्यबळ नाही आणि उपलब्ध मनुष्यबळाकडून या बेकायदा वाहतुकीकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत. या बेकायदा वाहतुकीमुळे अधिकृतपणे रिक्षेच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा चालक त्रस्त आहेत. उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी ग्रामीण भागात अचानक दौरे करून या बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करतात. पण ही कारवाई मनुष्यबळा अभावी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना नियमित करता येत नाही, त्याचा गैरफायदा हे बेकायदा प्रवासी वाहतूक करणारे जीप, ओमनी चालक घेत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
कल्याण ते मुरबाड, मुरबाड ते सरळगाव, म्हसा, सरळगाव ते टोकावडे, किन्हवली ते शेणवे, मुरबाड तालुक्यातील अंतर्गत गावे, शहापूर ते डोळखांब, शहापूर ते किन्हवली, शहापूर ते भातसानगर, अघई, वाडा, शहापूर ते भिवंडी, शेणवे ते किन्हवली, सरळगाव, भिवंडी ते वाडा, वज्रेश्वरी, आनगाव, पडघा अशा विविध मार्गांवर सकाळी सात ते रात्री उशिरापर्यंत सुमारे ७०० जीप, ओमनी वाहनांमधून प्रवाशांची बेकायदा वाहतूक सुरू असते. एस. टी. प्रवासासाठी जे तिकीट भाडे ३० ते ४० रूपये असते. जीप चालक याच प्रवासासाठी शेअर पध्दतीने प्रत्येक प्रवाशाकडून २० ते २५ रूपये भाडे घेतो. यामध्ये प्रवाशाचे पैसे वाचतात आणि एस. टी.वर अवलंबून न राहता झटपट प्रवास प्रवाशांना करता येतो, अशी माहिती एका माहितगाराने दिली.
या सर्व बेकायदा जीप, ओमनी आणि इतर खासगी वाहने शहापूर, मुरबाड, भिवंडी परिसरातील एस. टी. आगारांच्या परिसरात वाहनतळासारखी माळरान, ओसाडा जागा अडवून उभी असतात. स्थानिक वाहतूक पोलिसांशी या वाहन मालकाचे सलोख्याचे संबंध असल्याने समोर बेकायदा वाहतूक होऊनही स्थानिक वाहतूक पोलीसही या बेकायदा वाहतुकीकडे कानाडोळा करत असल्याच्या तक्रारी आहेत. वरिष्ठांनी आदेश दिला की फक्त कारवाईचा तात्पुरता एखाद दिवस देखावा उभा केला जातो. या कालावधीत काही वाहन चालक जीप गाड्या बंद ठेवतात. तर काही जण पर्यायी, आडमार्गाने प्रवासी वाहतूक करतात, अशी माहिती मिळते.हे बेकायदा वाहन चालक अवैध वाहतूक करत असल्याने या प्रवासी वाहतुकीतून एक पैसा शासनाकडे भरणा करत नाहीत. त्यामुळे शासनाचे लाखो रूपयांचे नुकसान या बेकायदा प्रवासी वाहतुकीतून होते.
उपप्रादेशिक परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ वाढविले. आणि या विभागाची भरारी पथके आठवड्यातून दोन ते तीन दिवस शहापूर, मुरबाड, भिवंडी परिसरात अचानक कारवाई करू लागली तर ही बेकायदा प्रवासी हळुहळू बंद पडेल. त्याचा लाभ राज्य परिवहन महामंडळाला होईल. यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विशेष पुढाकार घेण्याची मागणी नागरिकांकडून, रिक्षा संघटना, रिक्षा चालकांकडून जोर धरू लागली आहे.

3
423 views

Comment