logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

अमळनेरात SIR अभियानाला वेग; मतदार यादी पुनर्निरीक्षणात शिवसेना सक्रिय “बूथ प्रमुखच पक्षाचा कणा” – शिरीषदादा चौधरी


अमळनेरात SIR अभियानाला वेग; मतदार यादी पुनर्निरीक्षणात शिवसेना सक्रिय


“बूथ प्रमुखच पक्षाचा कणा” – शिरीषदादा चौधरी; प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा निर्धार


अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर येथे दिनांक १२ एप्रिल रोजी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) अभियान वेगाने सुरू असून, तब्बल २४ वर्षांनंतर निवडणूक आयोगाने हाती घेतलेल्या या मोहिमेमुळे राजकीय वातावरणात चांगलीच चैतन्याची लाट निर्माण झाली आहे. मतदार ओळख, पडताळणी आणि डिजिटल मॅपिंगच्या प्रक्रियेत बूथ प्रमुखांची खरी कसोटी लागणार असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

यावेळी बोलताना मा. आ. शिरीषदादा चौधरी यांनी सांगितले की, मतदार यादीवर आतापासून लक्ष केंद्रित केले तर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुका सहज जिंकता येतील. “हक्काचा मतदार मतदानापासून वंचित राहू नये आणि बोगस मतदारांना स्थान मिळू नये, यासाठी शिवसेनेच्या प्रत्येक BLA ने SIR अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले. नुकताच शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्ष नेतृत्वाने नंदुरबार लोकसभा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आगामी काळात नंदुरबार लोकसभा व अमळनेर विधानसभा मतदारसंघात घराघरात शिवसेनेचे विचार पोहोचविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले पारोळा-एरंडोल मतदारसंघाचे आमदार श्री. अमोलदादा पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संघटनेच्या बळावरच विजय शक्य असल्याचे सांगितले. “बूथ प्रमुख हा पक्षाचा कणा आहे. बूथ मजबूत असेल तर निवडणूक जिंकणे सोपे होते. त्यामुळे प्रत्येक बूथ प्रमुखाने आपल्या मतदार यादीचा सखोल अभ्यास करून अचूक माहिती संकलित करावी,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अमळनेर मतदारसंघात भगवा फडकविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

महिला आघाडी समन्वयक सौ. सरिताताई माळी यांनी सांगितले की, ना. एकनाथ शिंदे व ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा क्षेत्रनिहाय आढावा बैठकींद्वारे हे अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे आणि प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा.

प्रशिक्षण शिबिरात ॲड. ललिताताई पाटील यांनी SIR अभियानाचे महत्त्व, मतदार पडताळणी, डिजिटल मॅपिंग आणि बूथ नियोजन यावर सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील यांनी पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करत आतापासूनच निवडणूक तयारीला लागण्याचे आवाहन केले.

प्रास्ताविकात तालुका प्रमुख गुलाब पाटील यांनी “काम करण्याची तयारी नसलेल्यांनी पदावर राहू नये,” असा कठोर इशारा देत अभियानाचे महत्त्व अधोरेखित केले. सूत्रसंचालन चंद्रकांत कंखरे यांनी केले.

या कार्यक्रमास शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1
47 views

Comment